वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांच्या चौकशीची मागणी करणारे शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. धर्वेश कथेरिया यांना कुलसचिव कादर नवाज यांनी निलंबित केले आहे. विद्यापीठ प्रशासनाची परवानगी न घेता त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. प्रसार माध्यमांमध्ये वक्तव्ये केले. अनुशासनहीनता आणि अवज्ञा केल्याचा कथेरिया यांच्यावर आरोप आहे.
हिंदी विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संबंधित आक्षेपार्ह मुद्द्यांवर सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केले जात होते. या प्रकरणाची विद्यापीठ प्रशासनाकडे चौकशी करण्याची मागणी हिंदी विद्यापीठातील जनसंवाद विभागाचे सहयोगी प्राध्यापक व शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. कथेरिया यांनी केली होती. त्यानंतर व्हायरल मेसेजची सत्यता पडताळून पाहण्यासाठी रामनगर पोलिस स्टेशन, सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. या सर्व गोष्टींमुळे कथेरिया यांना विद्यापीठ कायद्याच्या कलम १२ (३) सह पहिल्या विधान २६ (१) अंतर्गत तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
कथेरिया यांच्याविरोधात आलेल्या तक्रारींच्या संदर्भात, एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करणार आहे. या तपासणीसाठी राष्ट्रीय विधि विद्यापीठ नागपूरचे निवृत्त कुलसचिव एन. एम. साकरकर, सहायक निबंधक राजेश अरोरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी तपासाचा अहवाल निबंधकांना सादर करणार आहे. निलंबनादरम्यान कथेरिया यांना दररोज कुलगुरू प्रा. हनुमानप्रसाद शुक्ला यांच्या कार्यालयात अहवाल देणार आहेत. कादर नवाज यांच्या स्वाक्षरीचा अधिकृत आदेश आज संबंधितांना जारी करण्यात आला.