रूपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : न्यायालयीन प्रक्रिया व नेहमीच पोर्टलच्या वादात अडकलेली जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. यात शासनाने दिलेल्या निकषानुसार आपल्याला जवळची शाळा मिळावी म्हणून शिक्षक शक्कल लढवित असल्याचे समोर येत आहे. कुठे अंतराच्या अटीत बसण्यासाठी १५ किमीचे अंतर ६२ किमी होत आहे तर कुणी अंपगत्वाचे खोटे कागदपत्र दाखल करून नियमाचा लाभ उचलण्याचे प्रकार जि.प. शिक्षण विभागात सुरू झाल्याचे दिसत आहे. हा सर्व प्रकार शहरालगतची शाळा मिळावी म्हणून होत असल्याचे बोलले जात आहे.जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये यंदा होणारी बदली प्रक्रिया ही सर्वात मोठी असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हा परिषदेत एवढ्या मोठ्या प्रमाणात बदली होण्याची ही इतिहासातील पहिलीच घटना असल्याचे अनेक कर्मचाऱ्यांकडून बोलले जात आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात २९०० शिक्षक कार्यरत असून त्यापैकी २५५० पेक्षा अधिक शिक्षक बदलीस पात्र आहेत. यामुळे शिक्षकांकडून शहरालगतची शाळा मिळावी म्हणून मोठ्या प्रमाणात खटाटोप सुरू असल्याचे दिसते.जिल्हांतर्गत बदल्या जाहीर करताना ग्रामविकास विभागाच्यावतीने अवघड आणि सुगम क्षेत्र जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यात वर्धा जिल्ह्यातील ९२८ शाळांपैकी केवळ ७ शाळा अवघड क्षेत्रात गेल्या आहेत. वर्धा जिल्हा आदिवासी व डोंगराळ भागाचा नसल्याने ही संख्या कमी आहे. यामुळे शिक्षकांचा जवळची शाळा मिळविण्यासाठी खटाटोप सुरू आहे. परिणामी, शिक्षकांकडून आश्चर्याचा धक्का बसणारे प्रकार जि.प.मध्ये घडत असल्याचे दिसून येत आहे.अनेकांना संवर्ग एकचा दर्जाहृदयरोग, कर्करोग, शारीरिक अपंगत्व, पाल्य मतिमंद असणे, कुमारिका, घटस्फोटीता, विधवा, माजी सैनिकाची पत्नी, स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य, अर्धांगवायु, ३१ मे २०१८ रोजी वयाचे ५३ वर्षे पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना विशेष संवर्ग एकचा दर्जा देण्यात आला आहे. हा दर्जा प्राप्त झाल्याने या शिक्षकांना जिल्ह्यात वाट्टेल तेथे स्वत:ची बदली मागण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. शासन निर्णयानुसार प्राप्त या दर्जाचा गैरवापर शिक्षकांकडून होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी अनेकांकडून अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र दाखल करण्याचे प्रकार घडत आहेत.बदली नको असणाऱ्यांकडून न्यायालयाच्या आदेशाची शक्यताअनेक शिक्षकांना ही बदली नको आहे; पण सर्वोच्च न्यायालयाने बदल्यांना हिरवा कंदील दिल्याने अशा शिक्षकांची अडचण झाली आहे. शासन आदेश आणि आॅनलाईन प्रक्रियेतील त्रूटी व काहींच्या खोटेपणामुळे बदली प्रक्रियेत अनेक गैरप्रकार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पूढे न्यायालयातून या बदली प्रक्रियेवर स्थगनादेश आणण्याची तयारी अनेकांकडून सुरू आहे.अंतराकरिता रापमचा आधारबदली प्रक्रियेत शिक्षक-शिक्षीका व त्यांचा जोडीदार नोकरीवर असल्यास पती-पत्नी एकत्रीकरणाकरिता ३० कि.मी. च्या आत येण्याची सुविधा देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरिता अनेक शिक्षकांकडून अंतराकरिता रापमचा लाभ घेतल्या जात आहे. मात्र वास्तविकतेत सर्वच शिक्षक आपआपल्या शाळेत स्वत:च्या वाहनाने जात असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. केवळ या अटीचा लाभ मिळविण्याकरिता त्याच्याकडून हा खटाटोप होत असल्याचे दिसत आहे. रापमची बस गाडी कोणत्याही गावात थेट न जाता चार-पाच गाव घेत जाते. यामुळे तिचे अंतर अधिक असते. याचाच लाभ काही बुद्धीमान शिक्षक घेत असल्याचे या बदली प्रक्रियेत दिसून येत आहे. रामपकडूनही यात कुठलीही चौकशी न करता सढळ हाताने प्रमाणपत्र दिले जात आहे.प्रक्रियेपूर्वी प्रमाणपत्र गरजेचेशिक्षकांकडून बदली प्रक्रियेत जवळची शाळा मिळविण्याकरिता अनेक खोटे प्रकार केले जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे जिल्हा परिषदेत शिक्षकांकडून दाखल होणाऱ्या अर्जांची बदलीची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वीच तपासणी करणे गरजेचे आहे. शिवाय यात सादर होणाऱ्या प्रमाणपत्रांची तपासणी तथा त्याबाबत शहानिशा करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्षण विभागाने तत्सम तपासणी केल्यास खोटेपणा बाहेर येऊ शकतो.
जवळच्या शाळेसाठी शिक्षकांकडून वाट्टेल ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:06 AM
न्यायालयीन प्रक्रिया व नेहमीच पोर्टलच्या वादात अडकलेली जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. यात शासनाने दिलेल्या निकषानुसार आपल्याला जवळची शाळा मिळावी म्हणून शिक्षक शक्कल लढवित असल्याचे समोर येत आहे.
ठळक मुद्देजिल्हांतर्गत बदलीमध्ये घडताहेत अनेक आश्चर्यकारक प्रकार