लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तंत्रज्ञानाचे हे युग असून याचा उपयोग ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास होणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानामुळे आज औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने बदल झाले आहेत. स्मार्टफोनने विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रात क्रांतीच केली आहे. एकट्या भारतात ४०० मिलियन स्मार्टफोन वापरले जातात. त्यामुळे अभियांत्रिकी आणि आयटी क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत, असे प्रतिपादन इन्फोसिसचे सहसंस्थापक अध्यक्ष तथा आधारचे संस्थापक अध्यक्ष नंदन नीलेकणी यांनी केले.शिक्षा मंडळद्वारा संचालित बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षा मंडळाचे अध्यक्ष, उद्योगपती राहुल बजाज, उपाध्यक्ष शेखर बजाज, सभापती संजय भार्गव प्रामुख्याने उपस्थित होते.मागील ३० वर्षांत तंत्रज्ञानाच्या क्षेत्राने मोठी भरारी घेतली. स्मार्टफोन, मिनी लॅपटॉप, मिनी कॅमेरा आदींत सॉफ्टवेअरमुळे बदल झाले आहेत. भविष्यात सॉफ्टवेअर कंपन्याच रोजगाराची दालने उघडणार आहेत. आगामी काळात लेजर टेक्नॉलॉजी येणार असून यावर काम केले जात आहे.लेजर टेक्नॉलॉजीचा अॅपल कंपनीने सर्वाधिक अंमल केला आहे. ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रातही या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. इंटरनेटच्या या युगात सोशल मीडियासोबतच आॅनलाईन शिक्षणप्रणालीचा उपयोग करावा, जेणेकरून नवनव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान उपलब्ध होईल. आज उपलब्ध असलेल्या नोकऱ्या उद्या नसतील आणि उद्या ज्याचा आपण विचार करतो, त्या आज तंत्रज्ञानाच्या काळात येऊ शकतात. म्हणून आपणास शिकत राहावे लागेल. स्वत: ला अपडेट ठेवावे लागेल. मेनफॉर्म कॉम्प्युटरमुळे जगामध्ये ऑटोमोबाईल्स, ऑटोमोटिव्ह, शूज, फूड या क्षेत्रात औद्योगिक तंत्रज्ञानात पदवी प्राप्त तरुणांना रोजगाराच्या संधी आहेत. जगात सात मिलियन लोक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. यात भारतीयांची संख्या लक्षणीय आहे, असे नीलेकणी यांनी नमूद केले. भारतात केवायसीच्या माध्यमातून डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रातही क्रांती केली. युनिक आयडीमुळे संजय गांधी निराधार योजना, पेन्शन योजना, गॅस सिलिंडर अनुदान आदी शासकीय योजनांमध्ये सहाय्यभूत ठरत असल्याचेही सरतेशेवटी त्यांनी सांगितले. कार्यक्रमात बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या इमारतीचे डिझाईन साकारणारे आर्किटेक्चर व विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल बजाज यांनी केले. संचालन संजय भार्गव यांनी केले.
ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास तंत्रज्ञानाचा वापर व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:55 AM
तंत्रज्ञानाचे हे युग असून याचा उपयोग ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास होणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानामुळे आज औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने बदल झाले आहेत. स्मार्टफोनने विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रात क्रांतीच केली आहे. एकट्या भारतात ४०० मिलियन स्मार्टफोन वापरले जातात.
ठळक मुद्देनंदन नीलेकणी : बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे उद्घाटन