लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सरकार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याच्या बाता करीत आहे. परंतु हल्ली अमेरीकेच्या कापूस बाजारात ३० टक्केपर्यंत मंदी आली असून या स्थितीत सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे करणार, असा सवाल शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे.भारत सरकारच्या कृषी मूल्य आयोगाने २०१८-१९ या वर्षात कापसाचा हमी भाव ५ हजार ४५० रुपये जाहीर केला होता. पण, यावर्षात रुपयाचे अवमुल्यन आणि सरकीच्या किंमतीमध्ये तेजी आल्याने शेतकऱ्यांना कापसाच्या हमी भावापेक्षा जास्त दर मिळाले. अमेरीकेच्या बाजारपेठेत रुईचे दर खुप जास्त वाढलेले नव्हते. ते २०११ पेक्षाही कमी ८० ते ९० सेंटे प्रती पाऊण्ड इतके होते. यानुसार ३५ किलो रुईची किंमत (७० रुपये प्रती डॉलरनुसार) ४ हजार ३१२ रुपये होते. त्यावर्षी ३ हजार ते ३ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल दराने सरकीची व्रिकी करण्यात आली. १ क्विंटल कापसापासून ६४ किलो सरकी मिळते. सरासरी ३० रुपये किलो सरकीच्या दराने १ हजार ९२० रुपये होतात. याचाच अर्थ असा की १ क्विंटल कापसापासून ४ हजार ३१२ रुपयाची रुई आणि १ हजार ९२० रुपयाची सरकी असे एकूण ६ हजार २३२ रुपये होतात. या पार्श्वभूमीवर विचार केल्यास यावर्षी २०१९-२० करीता कृषी मूल्य आयोगाने कापसाच्या हमी भावात केवळ १०० रुपये प्रती क्विंटल वाढ करुन ५ हजार ५५० रुपये केला आहे. आजच्या स्थितीत अमेरीकेच्या बाजारपेठेत रुईचे भाव ७० सेंट प्रती पाऊण्डपर्यंत खाली आले आहे. भारताचा रुपयाही ७० रुपयावर स्थिरावला आहे. जगभरात सोयाबीन ढेपीच्या दरातही मंदी आली आहे. परिणमी भारतात सरकी ढेपही मंदीच्या सावटात आहे. जेव्हा नवीन कापूस बाजारपेठेत येईल तेव्हा रुई आणि सरकीचे दर आणखी कमी होईल. त्यामुळे यावर्षी कापूस ५ हजार ५५० रुपयाच्या हमीभावातही विकल्या जाणार नाही. एकीकडे कापसाची आयात वाढत आहे. मागील वर्षी १५ लाख गाठी तर यावर्षी ३० लाखापेक्षा जास्त गाठी आयात करण्यात आल्या. कापूस आयातीवर कुठलाही कर नाही. अशा स्थितीत ६ हजार २०० ते ६ हजार ५०० रुपये दरात कापूस विकणारे शेतकरी ५ हजार २०० ते ५ हजार ५५० रुपयात कापूस विकेल तर त्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल, असा सवाल शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पत्रातून केला असून योग्य उपाययोजना करण्याची मागणीही केली आहे.
सांगा पीएम साहेब...! शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 4:21 PM
सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे करणार, असा सवाल शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे.
ठळक मुद्देविजय जावंधिया यांचा सवाल :अमेरिकेच्या कापूस व्यापारात मंदी