लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पुणे येथील खडकवासला धरणातील तब्बल २५ लाख ट्रक गाळ काढून आणखी मोठ्या प्रमाणात गाळ काढल्या जात असलेल्या ग्रीन थम्ब या संस्थेच्या पुढाकाराने वर्धा जिल्ह्यातील तब्बल दहा प्रकल्पातून गाळ काढून या प्रकल्पांना गाळमुक्त करण्यात येणार आहे. आगामी काळात हे काम कसे पूर्णत्त्वास जाईल याबाबतचा ॲक्शन प्लॅन गुरुवारी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. लोकसहभागातून होणाऱ्या या कामाविषयी जिल्हा प्रशासनही सकारात्मक असून लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
या दहा प्रकल्पांतून काढला जाणार गाळ- देवळी तालुक्यातील कोल्हापूर, आर्वी तालुक्यातील कुऱ्हा, महाकाळी, उमरी, सारंगपुरी, हिंगणघाट तालुक्यातील पोथरा, आष्टी तालुक्यातील आष्टी, सेलू तालुक्यातील डोंगरगाव, कारंजा तालुक्यातील कार प्रकल्प, सेलू तालुक्यातील बाेरधरण या तलावातून गाळ काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले हे विशेष.
विविध सामाजिक संघटनांचेही घेणार सहकार्य
- वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता वाढावी तसेच जिल्ह्यातील प्रमुख दहा प्रकल्पांना गाळमुक्त करण्यासाठी ग्रीन थम्ब ही सामाजिक संस्था इतर विविध सामाजिक संस्थांचेही सहकार्य घेणार आहे. प्रकल्पांच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होण्यासाठी प्रकल्प गाळमुक्त करणे या राष्ट्रीय कामात लोकसहभाग वाढावा म्हणून विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
पालकमंत्र्यांनीही जाणली माहिती- ग्रीन थम्ब या सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनी गुरुवारी पालकमंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत वर्धा जिल्ह्यातील कुठल्या प्रकल्पातून गाळ काढला जाईल, शिवाय त्याबाबतचा ॲक्शन प्लॅन कसा राहील, याबाबतची सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी ग्रीन थम्ब या संस्थेचे अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील आणि सुनील रहाणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मागेल त्या शेतकऱ्यास मिळेल गाळ- विविध प्रकल्पांमधील गाळ हा शेतीची सुपिकता वाढविण्यासाठी फायद्याचा ठरतो. त्यामुळे मागेल त्या शेतकऱ्याला गाळ दिला जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
वर्धा जिल्ह्यातील दहा प्रकल्पातून गाळ काढला जाणार आहे. त्यासंदर्भातील ॲक्शन प्लॅन वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना सादर केला आहे. मागेल त्या शेतकऱ्याला गाळ उपलब्ध करून दिला जाणार असून लोकसहभागातूनच हे काम होणार आहे.- कर्नल सुरेश पाटील, अध्यक्ष, ग्रीन थम्ब संस्था.