प्रशांत हेलोंडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जंगलांचे संवर्धन व संरक्षण करता यावे म्हणून वन विभागाकडून अनेक योजना राबविल्या जातात. यातील काही योजना ग्रामस्थांकरिता वरदान ठरू लागल्या आहेत. सध्या जिल्ह्यात ‘ग्रामवन’ ही योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून गावे सक्षम तथा स्वावलंबी करण्याचे प्रयत्न वन विभाग करीत आहे. शिवाय वन संवर्धन, संरक्षणाचा उद्देश्यही साध्य केला जात आहे.प्रत्येकाला रोजगार पुरविणे शासकीय यंत्रणेला शक्य नाही. यामुळे विविध माध्यमातून रोजगार निर्मितीचे प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून वन विभागामार्फत ग्रामवन योजना राबविली जात आहे. या योजनेतून वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गावात रोजगार निर्मितीचे प्रयत्न केले जात आहे. सध्या ही योजना जिल्ह्यातील दहा गावांमध्ये राबविली जात आहे. यात तळेगाव वन परिक्षेत्रातील रगडगाव, कारंजा वन परिक्षेत्रातील मरकसूर, आष्टी क्षेत्रात पांढुर्णा, खरांगणा (मो.) क्षेत्रात उमरी मासोद आणि सहेली, आर्वी अंतर्गत गुमगाव आणि चिंचोली तर समुद्रपूर वन परिक्षेत्रातील ताडगाव व जोगीनगुंफा या गावात ग्रामवन योजनेंतर्गत कामे केली जात आहे. सध्या या दहाही गावांमध्ये रोपवनाची कामे हाती घेण्यात आली आहेत. प्रत्येक गावात १० हेक्टर जागेमध्ये रोपवन केले जात आहे. ग्रामवन योजनेसाठी निवड झालेल्या दहा गावांमध्ये खड्डे खोदणे व लागवडीची कामे केली जात आहेत. यासाठी प्रत्येक गावात सुमारे ६ लाख रुपयांचा निधी खर्ची घातला जात आहे.वन विभागाच्या माध्यमातून या दहा गावांमध्ये अन्य कामेही लवकरच हाती घेतली जाणार आहेत. सदर कामे वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ग्रामस्थांनाच करावयाची आहेत. यातून त्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शिवाय अन्य कामांची संधी उपलब्ध होणार आहे. रोपवन तथा अन्य साधनांतून मिळणाºया उत्पन्नातून ग्राम समृद्ध करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. ग्रामस्थांना गावातच रोजगार मिळावा तथा जंगलांचेही संवर्धन व्हावे म्हणून ही योजना शासनाकडून हाती घेण्यात आली आहे. या योजनेला जिल्ह्यात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत असून प्राथमिक कामेही सुरू झाली आहेत. एनआर तथा एफआयसी या कामांसाठी प्रत्येक गावातील वन व्यवस्थापन समितीला सहा लाख रुपयांचा निधी देण्यात आलेला असून त्यातून कामे केली जात असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.१०० टक्के उत्पन्नाचा लाभ गावांनाचवन विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या ग्रामवन योजनेत दहा गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये रोपवनाची कामे सुरू करण्यात आली आहेत. प्रत्येक गावात १० हेक्टर जमिनीवर हे रोपवन केले जात असून यातून मिळणाऱ्या संपूर्ण उत्पन्नाचा १०० टक्के लाभ त्या गावालाच मिळणार आहे. यातून गावे सक्षम होण्यास मोलाचे सहकार्य मिळणार आहे. या माध्यमातून जंगलांचे संरक्षण व संवर्धन करण्याचा उद्देश्यही सफल होणार आहे. वन संवर्धन व संरक्षणाची जबाबदारीही वन व्यवस्थापन समिती तथा तेथील ग्रामस्थांवर सोपविण्यात येणार आहे. रोजगार मिळत असल्याने ग्रामस्थही स्व-खुषीने वनांचे संरक्षण, संवर्धन करतील, असा विश्वास वन विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.दोन ते अडीच वर्षांत जिल्ह्यात विविध नाविण्यपूर्ण कामे करण्यात आली. ग्रामवन योजना ग्रामस्थांसाठी फलदायी ठरणार आहे. वन विभागामार्फत राबविल्या जाणाºया उपक्रमांतून मिळणारे १०० टक्के उत्पन्न त्या गावांचेच राहणार आहे. मोबदल्यात केवळ ग्रामस्थ तथा वन व्यवस्थापन समितीकडून वन संवर्धन व संरक्षणाची अपेक्षा बाळगण्यात आली आहे.- दिगांबर पगार, उपवनसंरक्षक, वन विभाग, वर्धा.
‘ग्रामवन’ योजनेतून होणार दहा गावे सक्षम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:18 PM
जंगलांचे संवर्धन व संरक्षण करता यावे म्हणून वन विभागाकडून अनेक योजना राबविल्या जातात. यातील काही योजना ग्रामस्थांकरिता वरदान ठरू लागल्या आहेत. सध्या जिल्ह्यात ‘ग्रामवन’ ही योजना राबविली जात आहे.
ठळक मुद्देवन विभागाचा उपक्रम : रोपवनातून रोजगार निर्मिती