वर्धा : हिंगणघाट ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांनी मिर्झा शादाब बेग यांच्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांना मारहाण केली. तसेच वडिल मिर्झा परवेज बेग यांनाही शिवीगाळ केली. या पोलीस तणावाने धक्का बसून मिर्झा परवेज बेग यांची प्रकृती बिघडून त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेमुळे हिंगणघाट शहरात तणवाचे वातावरण निर्माण झाले असून रविवारी रात्रीच्या सुमारास जमावाने पोलीस ठाण्यात जात तोडफोड करुन पोलीस वाहनाच्या काचा फोडल्या. सोमवारी सकाळी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी हिंगणघाट येथे जाऊन प्रकरणाची माहिती घेतली. त्यावेळी, पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर आणि पोलीस उपनिरीक्षक आरीफ फारुखी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे. या घटनेमुळे हिंगणघाटात तणावपूर्ण वातावरण तयार झाले असून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर, दंगल नियंत्रण पथकही हिंगणघाट येथे दाखल झाले असून आज शहरातील सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.