वर्धा : सात जणांच्या सशस्त्र टोळीने रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या तीन मजुरांसह एका डॉक्टरला चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत त्यांच्याकडील रोख रक्कम तसेच मोबाईल जबरीने हिसकावून लूटमार केली. ही घटना वरुड ते पवनार रस्त्यावर १८ रोजी मध्य रात्रीच्या सुमारास घडली.
याप्रकरणी सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी १९ रोजी सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार, सचिन मनोहर येरुणकर (३०), रितेश श्रावण बुरबादे (२२), गौरव महेंद्र बोबडे (२१) तिन्ही रा. पवनार हे रात्रीच्या सुमारास सेवाग्राम परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतीतून काम आटोपून पवनार येथे परत येत असताना वरुड गावाजवळ अज्ञात सात जणांच्या सशस्त्र टोळीने रस्त्यात अडविले. तिघांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. सचिन येरुणकर याच्या मांडीवर शस्त्राने वार करीत त्यास जखमी केले. त्याच्याकडे असलेली ७ हजार रुपयांची रक्कम हिसकाविली. तसेच गौरव बोबडे याच्याकडील मोबाईल हिसकावून सातही आरोपींनी तेथून पळ काढला. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करुन सातही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती दिली.
वैद्यकीय अधिकाऱ्यालही केली मारहाणवैद्यकीय अधिकारी दुचाकीने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात कर्तव्यावर जात असताना सात जणांच्या टोळीने त्याला रस्त्यात अडवून शस्त्राचा धाक दाखवून त्याच्या खिशातील ५ हजार रुपयांची रक्कम हिसकावून घेत मारहाण केली. वैद्यकीय अधिकाऱ्याने त्याची दुचाकी तेथेच सोडून घटनास्थळावरुन जीव वाचवित पळ काढला. डॉक्टरने याबाबतचीही तक्रार सेवाग्राम पोलिसात दिली.