सेवाग्राम (वर्धा) : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आश्रमात देश-विदेशातील पर्यटक, अभ्यासक आणि अहिंसक आंदोलनावर विश्वास ठेवणारा मोठा वर्ग आश्रमातून प्रेरणा आणि ऊर्जा घेण्यासाठी येत असतो. आश्रमातील स्मारके गावखेड्यासारखी आहेत. यातील ‘आखरी निवास’ स्मारकाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.
आश्रम परिसरातील स्मारकांची काही कालावधीनंतर दुरुस्ती केली जाते. आखरी निवासच्या दुरुस्ती कामाला १३ मे २०२३ पासून सुरुवात करण्यात आली. २३ जूनला काम पूर्ण झाले असून, याकरिता ४२ दिवसांचा कालावधी लागला. राज्यपाल रमेश बैस यांनीही या आखरी निवासची पाहणी करून माहिती जाणून घेतली. गांधीजींनी १९३६ मध्ये आश्रमाची स्थापना केली होती. गांधीजींचे सतत १० वर्षे या आश्रमात वास्तव्य राहिले. स्मारकांना आदी निवास, बापू कुटी, बा कुटी आणि आखरी निवास या नावांनी ओळखले जाते. याच ‘आखरी निवास’मध्ये गांधीजी सहा महिने राहिले होते. याच निवासस्थानातून २५ ऑगस्ट १९४६ला ते दिल्लीला गेले ते परत न येण्यासाठी, म्हणून याला ‘आखरी निवास’ हे नाव देण्यात आले.
ही सर्व घरे माती, कुड, फाटे, बांबू, बोऱ्या व कवेलू आदींपासून निर्माण करण्यात आल्याने यांचे जतन व देखरेख फार महत्त्वाची आहे. आखरी निवास पर्यटकांसाठी सज्ज झाल्याने ते पाहण्यासाठी शनिवारपासून खुले करण्यात आले आहे. यासाठी शंकर वाणी, जानराव खैरकार, रामभाऊ काळे, नामदेव बघेकर, सुनील फोकमारे, नथ्थू झोरे, सुधाकर खडतकर, जयश्री पाटील आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.