हिंगणी (वर्धा) : सततच्या पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. अशातच पुलावरून पाणीही वाहत असताना दुचाकी चालवत नेण्याचे धाडस दोघांच्या अंगलट आले. त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री बोरधरण परिसरात घडली. अंकुश नागो चौधरी (६२, रा. बोरी (कोकाटे)) व इसराईल इस्माईल पठाण (५२, रा. हिंगणी) अशी मृतांची नावे आहेत.
अंकुश आणि इसराईल हे सोमवारी (एमएच ३२ एचव्ही १३१०) क्रमांकाच्या दुचाकीने काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. ते दुचाकीने सालई- बोरधरणमार्गे हिंगणीच्या दिशेने येत होते. सोमवारी सकाळपासूनच बोर धरणातील पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत असल्याने सालई ते बोरी मार्गावरील पुलावरून पाणी वाहत होते.
धरणातून विसर्गामुळे वाढली पाणीपातळी
हा पूल उतारावर आणि धरणाशेजारी असल्याने वाहत्या पाण्याला प्रचंड ओढा होता. विसर्गामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली हाेती.रात्री दोघे दुचाकीने हाच पूल पार करण्याचा प्रयत्न करीत असताना ते दुचाकीसह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. मंगळवारी सकाळी बोरी येथील काही नागरिक नदीच्या पात्रात मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांना पुलापासून ३०० मीटर अंतरावर दोघांचे मृतदेह आढळून आले. माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या घटनेची नोंद पोलिसांसह महसूल विभागाने घेतली आहे.