चैतन्य जोशी लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सध्या सोशल मीडियाच्या वापरामुळे पती-पत्नीत वादाचे प्रमाण वाढले आहे. वादाचे परिणाम थेट घटस्फोटापर्यंत जाऊन ठेपले आहे. असे असताना पोलिस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेलने आलेल्या करून तक्रारीवर समुपदेशन विस्कटलेले संसार पुन्हा जोडण्याचे काम केले आहे. मागील आठ महिन्यांत ९३९ तक्रारी आल्या, त्यापैकी ८६२ जोडप्यांचे संसार पुन्हा जुळविण्यात यश आले आहे.
पोलिस अधीक्षक कायार्लयात भरोसा सेलची निर्मिती करण्यात आली. या कक्षांतर्गत महिला सुरक्षा, विशेष बालसाहाय्य, स्त्री-भ्रूणहत्या, कौटुंबिक हिंसाचार, वयोवृद्धांचे समुपदेशन केले जाते. दिवसभरात सरासरी १५ ते २० तक्रारी प्राप्त होतात. त्यानंतर विस्कळीत झालेल्या जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांचा सुखी संसार पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.
अनेक जोडपे समुपदेशन झाल्यावर आपला सुखी संसार पुन्हा सुरू करण्यासाठी तयार होतात. समुपदेश केल्यानंतरही काही समाधानी होत नाहीत किंवा आपल्या तक्रारीवर ठाम असतात. अशा जोडप्यांना त्यांच्या अधिकाराची माहिती देऊन न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग दाखविला जातो. मागील काही वर्षांत संसार जुळविण्यात या कक्षाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोना महामारीपासून अनेकांचे रोजगार हिरावले, अनेक जण रस्त्यावर आले. अशातच काहींच्या नोकऱ्या 'वर्क फ्रॉम होम' झाल्या, यामुळे अनेक कुटुंबामध्ये खटके उडू लागले. अशातच पोलिस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेलमध्येही तक्रारींचा ओघ वाढू लागला आहे. नवरा दारु पितो, मोबाईलवर राहतो, असे अगदी क्षुल्लक वाद पोलिस ठाण्याची पायरी चढत आहे.
महिलांना मिळतोय आधारया कक्षाच्या निर्मितीमुळे पीडित महिलांना आधार मिळाला आहे. सध्या कक्ष प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक माधुरी वाघाडे यांच्यासह आठ ते दहा महिला कर्मचारी कार्यरत आहेत. याठिकाणी तक्रार दाखल होताच कक्षातील समुप- देशन अधिकारी तक्रारदार महिला व ज्याच्या विरोधात तक्रार केली अशा दोघांचेही समुपदेशन करतात.
आठ महिन्यांतील किती अर्ज ? महिना प्राप्त तक्रारी निपटारा दाखल गुन्हेजानेवारी ११५ ११५ ०१फेब्रुवारी ८९ ८९ ०१मार्च १२१ १२१ ०३एप्रिल १०१ १०१ ०२मे १११ १११ ०२जून १४५ १४५ ०४जुलै १४५ १४५ ०३ऑगस्ट ११२ ७७ ०३
हे काय तक्रारीचे कारण झाले ?
- पत्नीचे सोशल मीडियावर दिवसेंदिवस फॉलोअर्स कसे काय वाढत चालले.
- पतीने पत्नीचा मोबाइल हिसकावत विनाकारण वाद घातल्याने हे प्रकरण घटस्फोटापर्यंत येऊन ठेपले.
- पती दारु पितो, मोबाईलवर जास्त वेळ घालवतो. वेळ देत नाही.
३५ प्रकरणांत समुपदेशन सुरूभरोसा सेलमधील महिला पोलिस कर्मचाऱ्यांकडून दुरावलेल्या दाम्पत्यांचे समुपदेशन केले जाते. मागील आठ महिन्यांत तब्बल ९३९ तक्रारी भरोसाकडे प्राप्त झाल्या. यापैकी ८६२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. मात्र, काही प्रकरणे पोलिस ठाण्याची पायरी चढले असून, तब्बल ३५ प्रकरणे प्रलंबित असून, या प्रकरणांत दाम्पत्यांचे समुपदेशन सुरू आहे.
"भरोसा सेलकडे केवळ महिलाच नाही, तर पुरुष, बालके, वयोवृद्धही तक्रार करू शकतात. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन त्याचे समुपदेशन केले जाते. कोणताही संकोच न बाळगता तक्रारीसाठी पीडितांनी तक्रारीसाठी पुढे यावे."- माधुरी वाघाडे, सहायक पोलिस निरीक्षक, भरोसा सेल