चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा उपविभागात गुन्हेगारी डोके वर काढत असतानाच पोलीस यंत्रणा राबवत असलेल्या विविध उपाययोजनांमुळे वर्धा उपविभागाला अशांत करु पाहणाऱ्या गुन्हेगारांचा पोलिसांना बंदोबस्त करण्यात बहुतांश प्रमाणात यश आल्याचे दिसून येत आहे. वर्धा उपविभागात येणाऱ्या वर्धा, सेवाग्राम, सावंगी, सेलू, रामनगर, सिंदी, दहेगाव पोलीस ठाण्यांतर्गत घडलेल्या विविध गंभीर गुन्ह्यांची तसेच चोरी, घरफोडींच्या घटनांची ७० टक्के उकल करण्यात वर्धा उपविभाग यशस्वी ठरला आहे. वर्धा उपविभागात मागील वर्षभरात खुनाच्या १८ घटना, अत्याचाराच्या २० घटना, विनयभंगाच्या ७३ तर खुनाचा प्रयत्न करण्याच्या ११ घटना घडल्या. या सर्व घटनांची उकल करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात सातही पोलीस ठाण्यांतील पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांना अटक करुन गुन्ह्याची उकल केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये चांगलीच धडकी भरली असून यापुढेही अशी कारवाई केली जाणार आहे.
रामनगर हद्दीतील ३ गुन्हेगारी टोळ्या हद्दपार - रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व होते. या वर्चस्व वादातून अनेकदा वाद उफाळत होते. - मात्र, मागील वर्षभरात या तिन्ही टोळ्यांतील तब्बल १४ गुन्हेगारांना पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये हद्दपार करण्यात आल्याने रामनगर हद्दीत मारहाण, खुनाचा प्रयत्न, आदींसारख्या गंभीर घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते.
अपघातांच्या गुन्ह्यात १० टक्क्यांनी वाढ - गुन्हेगारीचा बिमोड करण्यात वर्धा उपविभाग यशस्वी झाला असला तरी अपघातांच्या गुन्ह्यांत मात्र वाढ झाल्याचे दिसून आले. - विविध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हद्दीत झालेल्या अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला, हे मात्र तितकेच खरे.
पोक्सो कायद्यान्वये ३१ गुन्ह्यांची उकल - बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक पोक्सो कायद्यान्वये मागील वर्षभरात वर्धा उपविभागात तब्बल ३१ गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे. त्यात १५ गुन्हे हे विनयभंगाचे तर १६ गुन्हे हे लैंगिक शोषणाचे असून, यातील सर्व आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे आरोपी आता कारागृहाची हवा खात आहेत.