प्रकल्पग्रस्त पाहून उपमुख्यमंत्र्यांनी फिरविली पाठ, कारंज्यात ताफा अडविण्याचा प्रयत्न
By आनंद इंगोले | Published: December 9, 2023 10:37 PM2023-12-09T22:37:37+5:302023-12-09T22:39:02+5:30
...त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी कोणताही संवाद न साधता पाठ फिरविल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
वर्धा : अमरावती येथून नागपूर अधिवेशनावर प्रकल्पग्रस्तांनी पायदळ मार्च काढला आहे. हा मार्च महामार्गाने जात असतानाच आज सायंकाळी कारंजा (घाडगे) जवळ प्रकल्पग्रस्तांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही ताफा नागपुरकडे जातांना दिसला. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी हा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच सुरक्षा यंत्रणेने प्रकल्पग्रस्तांना बाजुला सारले. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी कोणताही संवाद न साधता पाठ फिरविल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित मागणीकरिता अमरावती ते नागपूर असा पायदळ मार्च काढला आहे. सायंकाळी हा मार्च कारंजा (घाडगे) येथून जात असताना नारा फाट्याजवळ अमरावतीकडून नागपुरकडे जाणारे उपमुख्यमंत्री पवार यांचा ताफा दिसताच प्रकल्पग्रस्तांनी तो अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाल्याने काही काळ ताफा थांबला. तेव्हा प्रकल्पग्रस्तांनी रस्त्यावर बसून ताफा रोखून धरण्यासाठी धावपळ सुरु करताच पोलिसांनी त्यांना तातडीने बाजुला सारुन रस्ता मोकळा करुन दिला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
उपमुख्यमंत्र्यांनी संवाद न साधताच पुढचा रस्ता धरल्याने जोरदार घोषणाबाजी करुन प्रकल्पग्रस्तांनी रोष व्यक्त केला. हे सरकार शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांबाबत संवेदनशील नाहीच, असेही मोर्चाचे नेतृत्व करणारे मनोज चव्हाण म्हणाले.