वर्धा : मृत जनावरे कोंबून वाहतूक करणाऱ्या कंटेनरचे टायर फुटल्याने कंटेनर रस्त्याच्या कडेला लावून चाकलाने पोबारा केला. या मृत जनावरांची सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने शेतकऱ्यांनी याची माहिती देवळी पोलिसांना देताच आज सायंकाळच्या सुमारास हा सर्व प्रकार उडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आर.जे.१४ जीके.९६९६ क्रमांकाचा कंटेनर जनावरे घेवून यवतमाळकडे जात होता. यादरम्यान बुधवारी रात्री आठ वाजता देवळी येथील यशोदा नदीच्या पुलाजवळ कंटेनरचे टायर फुटल्याने चालकाने वाहने अंदोरी मार्गावरील एकपाळा शिवाराकडे वळवून रस्त्याच्या बाजुला उभे केले. त्यांनतर कंटेनर तेथेच सोडून तेथून पळ काढला. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दुर्गंधी पसरल्याने याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक शफकत आमना यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाळून पाहणी केली असता २२ जनावरे मृत तर तीन अत्यावस्थ आढळून आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणाली जोशी यांनी पाहणी केली असता ही जनावरे चार ते पाच दिवसांपूर्वी मृत पावली असल्याने त्याचे शवविच्छेदन करता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे मृत सर्व जनावरे जमिनीत पुरण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. तर अत्यावस्थ असलेल्या जनावरांना पडेगाव येथील गोशाळेत पाठविणार असल्याचे सांगितले. हा कंटेनर तौसिफ अहमद यांच्या नावे असल्याने पुढील तपास पोलीस करीत आहे. घटनास्थळी कुणाल हिवसे, गजानन इवनाथे, चंद्रभान मेघरे, आकाश कसर व दयाल धवने हे पोलीस कर्मचारी कार्यरत होते.