वर्धा : कारंजा घाडगे तालुक्यात बोंदरठाणा, चिंचोली, शेलगाव उमाटे या परिसरामध्ये गुरुवारी (दि. २९) दुपारी ३ वाजेपासून मुसळधार पाऊस झाला. सायंकाळी बोंदरठाणा येथील खरकाडी नदीला मोठा पूर आला. नदीच्या पुरात शेतमजूर वाहून गेला.
अंबादास बंडूजी श्रीराम (४०, रा. बोंदरठाण) असे वाहून गेलेल्या शेतमजुराचे नाव आहे. वृत्त लिहिस्तोवर त्यांचा शोध लागला नव्हता. तालुक्यात गुरुवारी दुपारपासून पावसाने हजेरी लावली. काही वेळानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. अंबादास श्रीराम गावातील इतर शेतकऱ्याच्या शेतात फवारणी करीत होते. सायंकाळी ते घरी परत येत होते. दरम्यान, मुसळधार पावसामुळे खरकाडी नदीला मोठा पूर आला होता. त्यामुळे ते बाजूला असलेल्या प्रवीण हिंगवे यांच्या शेतात सहज बसण्यासाठी गेले. मात्र, घरी लवकर परतण्याच्या बेताने ते पुरातून निघण्यासाठी नदीत शिरले. मात्र, पुराचा अंदाज न आल्याने अंबादास वाहून गेले.
राजनी ते बोंदरठाणा रस्त्यापासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर एक बंधारा आहे. त्या बंधाऱ्यावरून अंबादास येत होते. परंतु त्यांना दुसरे टोक गाठता आले नाही. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते पुरात वाहून गेले. वृत्तलिहिस्तोवर त्यांचा शोध लागला नव्हता. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार ऐश्वर्या गिरी, नायब तहसीलदार भाऊ टिपरे, मंडळ अधिकारी भाऊ आत्राम, बोंदरठाणाच्या तलाठी ताई दळवणकर, कोतवाल भाऊ सोनुले घटनास्थळी दाखल झाले. रात्री अंधारात शोधकार्य करता येत नसल्याने वाहून गेलेल्या अंबादास श्रीराव यांचा शोध लागला नाही. दरम्यान, शोधकार्यात अडथळा येत असला तरी रात्रीपर्यंत शोधकार्य सुरू होते.