लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रुग्णांचा वाढता व्याप लक्षात घेता अल्प मनुष्यबळ कार्यरत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांवर नागरिकांचा विश्वास अजूनही कायम आहे. या रुग्णालयातून प्रत्येक रुग्णाला चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न होत असून गुरुवारी प्रथमच या रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया करून अमरावती येथील रहिवासी असलेल्या महिलेला दिलासा देण्यात आला. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर डॉक्टरांचा ‘वॉच‘ आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूती विभागात अमरावती जिल्ह्यातील बोरगाव (धांदे) येथील रहिवासी असलेली शीला मोहन वानखेडे या दाखल झाल्या. विविध तपासण्या केल्यावर शीला यांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यानंतर डॉक्टरांनी शीला त्यांच्यावर शस्त्रक्रियेचा सल्ला नातेवाईकांना दिला. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च कोठून उभा करावा, असा प्रश्न शीला यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांसमोर उभा ठाकला. पण अशा परिस्थितीत जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शीला यांना धीर देत शासकीय योजनेंतर्गत शस्त्रक्रिया करता येईल. पण, आपण त्यासाठी तयार आहेत काय, अशी विचारणा केली. त्यानंतर शीला यांनी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांवर विश्वास ठेवून शस्त्रक्रियेसाठी होकार दर्शविला. त्यानंतर स्त्री कर्करोग, वंध्यत्व, प्रसूती व स्त्रीरोग लेप्रोस्कोपी सर्जन डॉ. प्रवीण करवाडे यांना पाचारण करण्यात आले. गुरुवारी डॉ. प्रवीण करवाडे व स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. मनीषा नासरे यांनी शीला यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. विशेष म्हणजे शीला वानखेडे यांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यात आला आहे. शस्त्रक्रिया सुरू असताना शिला वानखेडे यांच्या प्रकृतीवर तज्ज्ञ डॉक्टरांचा बारकाईनेच वॉच होता, हे विशेष.
यांचे लाभले सहकार्य- शीला यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया व्हावी म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल वानखेडे, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे, जिल्हा समन्वयक डॉ. स्मिता हिवरे, डॉ. प्रियंका तळवेकर, डॉ. मारिया खातून, डॉ. प्रशांत बोंडे, भूलतज्ज्ञ डॉ. गजेंद्र कपूर, राहुल बर्डे, दुर्गा चौधरी, दिव्यांनी ठाकरे, ईश्वर वडे, विनोद पंधरे, सुकेशनी शेंदरे, रोशन कुत्तरमारे, अमोल चाफले, सारंग भुंबरे आदींचे सहकार्य लाभले.
शस्त्रक्रियेला लागले सहा तास
- यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याने शीला वानखेडे यांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर झालेली ही अवघड शस्त्रक्रिया तब्बल सहा तास चालली.- डॉक्टरांनीही भूकेची तमा न बाळगता ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्यामुळे अमरावती येथील शिला वानखेडे यांना दिलासा मिळाला आहे.