वर्धा : पुरामुळे अनेक रस्त्यांवर मोठाले खड्डे पडले आहे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने, अनेकांच्या वाहनांचे नुकसान होत असते. असाच प्रसंग ढगा ते ब्राह्मणवाडा मार्गावरील पुलावर घडल्याचे दिसून आले. खड्ड्यांत अडकलेले वाहन दोराने बांधून ठेवले होते. मात्र, धाम नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहन वाहून गेल्याने, दुसऱ्या दिवशी १७ रोजी जेसीबीच्या साहाय्याने पुरात अडकलेले वाहन नदीपात्राबाहेर काढण्यात आले.
वर्ध्यातील ढगा ते ब्राह्मणवाडा मार्गावर ढगा भवनाजवळ धाम नदीच्या पुलावरून थोडं पाणी वाहत होते. चालकाने वाहन पुढे नेले, पण पुलावर असलेल्या खड्ड्यात वाहनांचे चाक अडकल्याने वाहन जागीच थांबले. वाहनात बसलेले पाचही जण वाहनाबाहेर येत वाहन काढण्यासाठी प्रयत्न करू लागले. मात्र, त्यांना यश आले नाही.
त्यांनी सदर वाहन दोराच्या साहाय्याने पुलाच्या कठड्यांना बांधून ठेवले आणि दुसऱ्या वाहनाला आणण्यासाठी गेले. मात्र, काही वेळानंतर परिसरात पाऊस झाल्याने पुलावरून आलेल्या पुरात अडकलेले वाहन पुलाच्या खाली कोसळले. दुसरं वाहन मदतीसाठी घेऊन येईपर्यंत पुलावर अडकलेलं वाहन पुरात वाहून गेले. दुसऱ्या दिवशी पाणी कमी झाल्यानंतर हे वाहन दिसून आले. जेसीबीच्या साहाय्याने वाहन पाण्याबाहेर काढण्यात आले. यात वाहनाने मोठे नुकसान झाले.