लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयात बालरोग विभागात कार्यरत डॉ. संजय गाठे यांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढणारा नोटीस दिल्याच्या कारणातून डॉ. गाठे यांनी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वानखेडे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली होती. याप्रकरणाची तीन सदस्यीय समिती गठित करीत सोमवार, दि. १८ रोजी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. याप्रकरणी चौकशी करीत वरिष्ठांकडे अहवाल सादर केल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांकडून सांगण्यात आले. मात्र यात केवळ मारहाण प्रकरणाची चौकशी केली. ममो दिलेल्या प्रकरणासंदर्भात चौकशी सुरू असल्याने अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना अशी शंका वर्तविण्यात येत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या एसएनसीयूत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी हे त्याच्या खासगी रुग्णालयातून फोनवरून बालकाचे उपचार करीत असल्याची बाब पुढे आल्याने हा प्रकार एनएससीयूतील बालमृत्यूत भर घालणारा आहे, अशी टिप्पणी करणारी नोटीस डॉ. गाठे यांना बजावला होता. या नोटिसीच्या कारणावरून वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गाठे यांनी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल वानखेडे यांना शिवीगाळ करून मारहाण करीत जीवे मारण्याची धकमी दिली होती. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने डॉ. मनोज सक्तेपार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठित करीत सोमवारी सकाळी १० वाजता संजय गाठेंसह अन्य अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी चौकशी करीत वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक सुमंत वाघ यांनी सांगतिले. यात मारहाणप्रकरणी चौकशी अहवाल सादर करण्यात आला आहे. मेमो दिल्याप्रकरणी अजूनही चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
पाच सदस्यीय समिती गठीत जिल्हा सामान्य रुग्णालयात बालमृत्यू मेमो दिल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांनी पाच सदस्यीय समिती स्थापन केली असल्याचे सांगण्यात आले आहे. यात डॉ. आशिष लांडे, अध्यक्षतेत वर्ग एकच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अन्य डॉक्टरांचा समावेश असल्याचे माहिती खात्रीदायक सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
"मारहाण प्रकरणात पाच- सहाजणांचे बयाण नोंदविण्यात आले. त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. बालमृत्यू प्रकरण मेमो संदर्भात समिती गठित केली आहे. त्याची चौकशी सुरु आहे." - डॉ. सुमंत वाघ, जिल्हा शल्यचिकित्सक, वर्धा