आनंद इंगोले
वर्धा : देश बदलला की वेश बदलतो अन् हळूहळू पाश्चात्त्य संस्कृतीच्या वलयात आपली संस्कृतीही बदलायला लागते. परंतु आजही काही देशप्रेमी परदेशात गेल्यानंतरही आपल्या मातीशी असलेली नाळ जपण्याचा प्रयत्न करतात. वर्ध्यातील एक दाम्पत्य त्यापैकीच एक. जर्मनीत स्थायिक झालेल्या या दाम्पत्याने मराठी मातीशी असलेली नाळ तुटू दिली नाही. वर्ध्यातील या दाम्पत्याने आपली मराठमोळी संस्कृती जर्मनीत कायम राखली. त्यांच्या मराठमोळ्या लूकने पाश्चात्त्यांनाही भुरळ घातली. इतकेच नाही तर उपस्थितांनी मुक्तकंठाने भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्रीयन वेशभूषेचे कौतुकही केले. निमित्त होते जर्मनीतील डुसेलडॉर्फ शहरातील जपान दिनाच्या कार्यक्रमाचे.
वर्ध्यातील रूपाली लिखितकर आणि रजत लिखितकर हे दाम्पत्य गेल्या तीन वर्षांपासून जर्मनीमधील डुसेलडॉर्फ शहरात नोकरीनिमित्ताने वास्तव्यास आहे. रूपाली ही एका कंपनीत एचआर म्हणून कार्यरत आहे, तर रजत हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. या दोघांनीही पाश्चात्त्य देशात आपले आयुष्य घडवायला सुरुवात केली. परंतु आपली संस्कृती, आपले सण, याचा विसर पडू दिला नाही. जर्मनीत असूनही ते आपले सण नित्यनेमाने साजरे करतात. तेथे आपल्या मायमराठीचा डंका मिरविण्याची ते एक संधीही सोडत नाही. त्यामुळे तेथे राहणारे भारतीयही त्यांच्यासोबत जुळले आहे. नुकताच डुसेलडॉर्फ शहरात दरवर्षीप्रमाणे जपान दिवस साजरा करण्यात आला. या दिनाच्या कार्यक्रमात दहा लाखांपेक्षा अधिक लोक सहभागी होतात. यामध्ये रूपाली आणि रजत दोघेही सहभागी झालेत. यात रूपालीने नऊवारी व फेटा तर रजतने बंगाली, पायजामा व टोपी अशी मराठमोळी वेशभूषा केली होती. ही वेशभूषा उपस्थितांना एकदम आकर्षित करून गेली. अनेकांनी रूपाली आणि रजतसोबत सेल्फी, फोटो काढून घेण्याकरिता गर्दी केली होती. हा सर्व प्रकार पाहून या लिखितकर दाम्पत्याला आपल्या संस्कृतीचाही अभिमान वाटला.
..म्हणून हा दिवस होतो साजरा
दुसऱ्या विश्वयुद्धादरम्यान जपान आणि जर्मनीचे संबंध खूप चांगले होते. त्यादरम्यान जपानमधील काही नागरिक स्टील कंपनीची सुरुवात करण्याकरिता आजूबाजूच्या शहरात पाहणी करीत होते. तेव्हा त्यांना जर्मनीतील डुसेलडॉर्फ हे शहर खूपच आवडले. त्यांनी याच ठिकाणी व्यवसाय सुरू करून त्यात प्रगतीही साधली. २०२१च्या माहितीनुसार या शहरात ११ हजारांपेक्षा जास्त जपानी लोक जर्मनीला आपलं घर मानतात. म्हणूनच या ठिकाणी जपान दिवस साजरा केला जातो. या दिवसाला जपानची संस्कृती, भोजन, पेय आणि पोशाख आणि तेथील वस्तूंचे प्रदर्शन केले जाते.
देशवासीयांना करतात मार्गदर्शन
जर्मनीमध्ये शिक्षण मोफत असल्याने आपल्या देशातील किंवा महाराष्ट्रातील युवक-युवतींना लिखितकर दाम्पत्य नेहमी मार्गदर्शन करीत असतात. आपल्याकडील युवक-युवतींनीही जर्मनीमध्ये शिक्षण घेऊन चांगली नोकरी करावी, याकरिता रूपाली आणि रजत हे दोघेही ऑनलाइन उपलब्ध असतात. दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून जर्मनीतील शिक्षण आणि नोकरीच्या संधी याबाबतही युवक-युवतींना सहकार्य करीत असतात.
जर्मनीत वास्तव्यास असताना आपल्या संस्कृतीची जोपासना करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. आपल्या देशातील मुलांना या ठिकाणी शिक्षण व नोकरी मिळावी, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नरत असतो. नुकताच डुसेलडॉर्फ या शहरात जपान दिन साजरा करण्यात आला. त्यात आम्ही मराठमोळा पोषाख घालून सहभागी झालो. तेव्हा उपस्थितांनी अक्षरशः उभे होऊन आम्हाला नमस्कार केला. हा भारतीय संस्कृतीचा आणि महाराष्ट्रीयन पोषाखाचा सन्मान आहे. विदेशातील हा सन्मान पाहून आम्ही भारावून गेलो. यावरून आपली संस्कृती किती श्रेष्ठ याचाही परिचय आला.