वर्धा : पहिल्या वर्गाचे शिक्षण घेणाऱ्या दोन मुलींचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला दंडासह आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल वर्धा येथील जिल्हा न्यायाधीश-१ आर. जे. राय यांनी दिला. रविंद्र दिवान उईके रा. पिंपळखुटा ता. आर्वी असे शिक्षेस पात्र ठरलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
आरोपी रविंद्र उईके याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ६ नुसार मरेपर्यंत जन्मठेप व दहा हजारांचा दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्षांचा सश्रम कारावास. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ अन्वये २० वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास एक वर्षांचा सश्रम कारावास. तसेच भादंविच्या कलम ३६३ अन्वये पाच वर्षांचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवसांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
जंगल परिसरात नेत चिमुकलींवर केला विनयभंग
पहिल्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या सात वर्षीय दोन्ही पीडितांना आरोपीने सुरूवातीला खाण्यासाठी केळी दिल्या. त्यानंतर विविध आमिष देत दोन्ही पीडितांना सोबत नेते. इतकेच नव्हे तर नाल्यातील पाणी प्यायला देत खाली पडलेली खिचडी खायला दिली. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने पीडितांना जंगल परिसरात नेत त्यांचा विनयभंग केला. शिवाय पीडितांना शेत शिवारात सोडून पोबारा केला. शोध घेतल्यावर पीडिता कुटुंबियांना मिळाल्या. पीडितांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितल्यावर संबंधित घटनेवरून पडदा हटला. त्यानंतर या प्रकरणी खरांगणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.तेरा साक्षदारांची तपासली साक्ष
संबंधित प्रकरणाचा तपास महिला पोलीस अधिकारी स्वाती यावले यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. शासकीय बाजू ॲड. गिरीष व्ही. तकवाले यांनी न्यायालयात मांडली. पैरवी अधिकारी म्हणून किशोर अप्तुरकर यांनी काम पाहिले. या प्रकरणी एकूण तेरा साक्षदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद आणि पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीश आर. जे. राय यांनी आरोपीला शनिवारी शिक्षा ठोठावली.