फोडाफोडीच्या राजकारणाने जनता त्रस्त; आगामी निवडणुकांत कौल देणार - अनिल देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 11:59 AM2023-07-13T11:59:32+5:302023-07-13T16:40:46+5:30
पत्रकार परिषदेत भाजपवर सडकून टीका, कार्यकर्त्यांना सूचना
वर्धा : आगामी निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर जिंकू शकत नाही, हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी फोडाफोडीचे राजकारण सुरू केले; मात्र या फोडाफोडीच्या राजकारणाला आता जनता त्रस्त झाली असून आगामी निवडणुकांत महाविकास आघाडीलाच कौल देणार आहे. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त करून भाजपावर सडकून टीकाही केली. शरद पवार यांच्या गटाकडून पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रपरिषदेला माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी, प्रदेश सरचिटणीस किशोर माथनकर, राजा टाकसळे आदींची उपस्थिती होती.
अनिल देशमुख पुढे म्हणाले की, सरकारमधील अस्वस्थ आमदार पुढील काळात कसे तोंड उघडतील ते पाहण्यासारखे राहणार आहे. सध्या फक्त सुरुवात झाली असून बच्चू कडू विरोधात बोलत आहे; पण आता एक एक बोलायला लागणार आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून आमदारांमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. सत्ताधाऱ्यांचा त्यांनाच सांभाळण्यात वेळ चालला असून इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. सरकारने तत्काळ खातेवाटप करून नागरिकांच्या प्रश्नांना न्याय द्यावा, अशी मागणीही अनिल देशमुख यांनी केली आहे.
राज्यात सरकारमध्ये भाजपचे १०५ आमदार निवडून आले असतानाही केवळ ५ ते ६ आमदार मंत्री झालेत. घरचे बाहेर अन् बाहेरचेच घरात आले. आम्ही पक्षातले असून बाहेर आणि बाहेरून आलेले पक्षात पहिल्या पंगतीत बसत असल्याचे भाजपचेच आमदार बोलत असल्याने भाजपातील आमदार अस्वस्थ असल्याचे ते म्हणाले. काही बोटावर मोजण्या इतकेच जिल्हाध्यक्ष अजित पवार यांच्या गटात गेले असून संपूर्ण राष्ट्रवादीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे ते म्हणाले.
शिंदे गटाचे आमदार खासगीत बोलू लागले
शिंदे गटासोबत गेलेल्या ४० आमदारांपैकी अनेकांनी मंत्रिपदाची आशा आता सोडली आहे. शिंदे गटांतील ४० आमदारांपैकी कुणालाही मंत्रिमंडळात सामावून घेतले नसल्याने ते देखील अस्वस्थ आहेत. आता हळूहळू शिंदे गटातील आमदार बोलू लागले असून पुढील काळात काय होते ते नागरिक पाहतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
ट्रॅव्हल्स अपघातातील मृतांना श्रद्धांजली
सिंदखेड नजीक झालेल्या ट्रॅव्हल्स अपघातात वर्धा जिल्ह्यातील १४ जणांना जीव गमवावा लागला. ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून प्रशासनाने समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजनाही कराव्यात, असे म्हणून त्यांनी मृतकांना श्रद्धांजली वाहिली.
पक्ष अन् चिन्ह शरद पवारांकडेच
शरद पवार यांनी पक्ष बांधल्याने आज इथपर्यंत आला. राष्ट्रवादीतील महत्त्वाचे नेते सत्ताधारी पक्षात गेले याचं दुख आहे; पण राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचे चिन्ह हे शरद पवार यांच्याकडेच राहिल, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्टीकरण दिलेले असल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगितले.