लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : हिंगणघाट ते वर्धा मार्गावरील वेळानजीकच्या टेक्सटाइल पार्कजवळील खड्डे नागरिकांच्या जिवावर उठल्याची ओरड सातत्याने केली जात आहे. पण, प्रशासनासह कंत्राटदाराकडूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने येथील खड्ड्यात दुचाकी उसळून एका बँक अधिकाऱ्यांसह दोघांना जीव गमवावा लागला तर दोघांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात बुधवारी रात्री ९ वाजतादरम्यान झाला असून, तीव्र रोष व्यक्त होत आहे.
अमोल बाबाराव पराते (३६, रा. स्वस्तिक कॉलनी वरुड, हल्ली मुक्काम तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट) व संजय नांदे (४० रा. माता मंदिर वॉर्ड, हिंगणघाट) अशी मृतांची नावे आहेत, तर महेश उईके (२४, रा. निशानपुरा वॉर्ड, हिंगणघाट) व राहुल पराते (२४ रा. टिळक वॉर्ड, हिंगणघाट) अशी जखमींची नावे आहेत. मृत अमोल पराते हे बैंक ऑफ इंडियाच्या नागरी येथील शाखेत व्यवस्थापक होते. ते वर्ध्याला अधिकाऱ्यांच्या बैठकीकरिता गेले होते. वर्ध्यातील बैठक आटोपून रात्रीला नऊ वाजता बुलेटने हिंगणघाटकडे येत असताना वेळानजीकच्या टेक्सटाइल पार्कजवळील खड्यातून बुलेट उसळून हा अपघात झाला. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर याच ठिकाणी संजय नांदे, महेश उईके व राहुल पराते यांच्याही दुचाकीचा अपघात झाला असून, यात दुचाकीचालक संजयचा रुग्णालयात आणत असताना मृत्यू झाला. हे तिघेही एकाच दुचाकीने वर्धेकडून हिंगणघाटकडे जात होते. यांचीही दुचाकी उसळल्याने तिघेही रस्त्यावर आदळले. गंभीर जखमी झाल्याने तिघांनाही सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात संजयचा मृत्यू झाला असून दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
कंत्राटदारावर गुन्हा दाखल कराहिंगणघाट ते वर्धा मार्गावर कंत्राटदाराने खोदकाम करून ठेवले आहे. येथे कोणतेही सूचनाफलक किंवा सुरक्षा कठडे लावले नसल्याने दोन्ही दुचाकीचालकांना खड्याचा अंदाज आला नाही. परिणामी एका बँक अधिकाऱ्यांसह दोघांना जीव गमवावा लागला. अपघाताची माहिती मिळताच बँक मृत अमोल पराते ऑफ इंडियाचे जिल्हा प्रबंधक चेतन शिरभाते, वरिष्ठ अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी वैभव लहाने यांनी घटनास्थळ गाठले. तसेच प्रहारचे विदर्भ प्रमुख गजू कुबडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या निवेदनाची दखल घेऊन तहसीलदारांना चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
रस्ता नकोत पण, जीवघेणा विकास आवराहिंगणघाट ते वर्धा मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून आता कंत्राट- दाराने त्यात आणखीच भर घातली आहे. एका बाजूने रस्ता खोदला पण, सुरक्षा कठडे लावले नाही. या मार्गावर सतत वर्दळ राहत असल्याने अपघाताचा धोका लक्षात घेता आंदोलन करून प्रशासनाला निवेदनही देण्यात आले. परंतु कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने दोघांना जीव गमवावा लागला. परिणामी आता रोष खदखदत असून रस्ता नकोत पण, जीवघेणा विकास आवरा, अशी मागणी हिंगणघाटकरां- कडून केली जात आहे.