लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शांतिप्रिय जिल्हा म्हणून वर्धा जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, जिल्ह्यात ‘सॅटरडे नाइट’ पार्टीचे आयोजन ही बाब काही पटणारी नव्हती. मग काय पोलिसांनी वेळीच पालोती गावासमोर असलेले फार्म हाऊस गाठून सुरू असलेल्या ‘डीजे पार्टी’चा डाव उधळून लावत पार्टीचे आयोजन करणाऱ्यासह फार्म मालकास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी अटक केलेल्यांत जि. प. सदस्य उमेश गोपाळ जिंदे, रा. आनंदनगर आणि सौरभ दिलीपसिंह ठाकूर रा. वंजारी चौक यांचा समावेश आहे. सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पालोती गावाच्या काही दूर अंतरावर जिंदे याचे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर सौरभ ठाकूर याने ‘सॅटरडे नाइट डीजे’ पार्टीचे आयोजन केले होते. यासाठी त्यांनी सोशल मीडियावरदेखील मोठा गाजावाजा केला होता. या पार्टीत तरुणाईने मोठ्या संख्येत हजेरी लावली होती. मात्र, याची चुणूक सावंगी पोलिसांना लागताच रात्री १०.३० वाजेच्या सुमारास सावंगी पोलिसांनी पालोतीस्थित ‘फ्री कॉइन्स’ फार्म हाऊस गाठून पोलिसांनी या पार्टीचा डाव उधळून लावत दोघांना बेड्या ठोकल्या.
डीजे अन् कारसह ३.५२ लाखांचा दारूसाठा जप्त- पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार धनाजी जळक यांनी डीजे पार्टीवर छापा टाकून महागड्या कंपनीचा दारूसाठा आणि बीअर, असा ४४ हजार ५०५ रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त केला. २ लाख रुपये किमतीचा डीजे ज्या कारमधून दारू आणली गेली ती कार (क्र. एम.एच. २० यू. ६८६६), सीसीटीव्ही कॅमेरा, डीव्हीआर असा ३ लाख ५२ हजार ५०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अन् पोलिसांनी उतरविली तरुणाईची झिंग - रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पार्टीत पोलिसांची एन्ट्री होताच तरुणाई सैरभैर पळू लागली. ठाणेदार धनाजी जळक यांच्यासह कर्मचाऱ्यांनी फार्म हाऊसमधील दोन्ही फाटकं बंद करून तरुणाईमध्ये चढलेली दारूची झिंग उतरविली. सोशल मीडियावरूनही करण्यात आली प्रसिद्धी- सुमारे महिनाभरापूर्वीपासूनच पालोती येथे होणाऱ्या पार्टीचे नियोजन करण्यात आले होते. याबाबत सोशल मीडियावरूनही प्रसिद्धी दिली जात होती. विविध व्हॉटसअपग्रुपवरदेखील पार्टीबाबत माहिती टाकून ऑनलाइन तिकीट बुक करण्याबाबत सांगितले होते.
पहाटेपर्यंत सुरू होती पोलीस कारवाई...- पालोती गावानजीक फ्री कॉइन फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या डीजे पार्टीचा डाव पोलिसांनी उधळून लावल्यानंतर संपूर्ण फार्म हाऊसची तपासणी करण्यात आली. पहाटे ४ वाजेपर्यंत ही कारवाई सावंगी पोलिसांकडून करण्यात आल्याची माहिती आहे. वर्ध्यात अशी पहिलीच मोठी कारवाई आहे, हे विशेष.
रात्री उशिरापर्यंत डीजे पार्टी सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पालोती येथील फार्म हाऊसवर छापा टाकून वेळीच पार्टीचा डाव उधळून लावला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. पार्टीत मोठ्या प्रमाणात विदेशी दारूसाठाही आढळून आला. सीसीटीव्ही डीव्हीआरची तपासणी करून पुढील कारवाई करण्यात येईल.धनाजी जळक, पोलीस निरीक्षक, सावंगी (मेघे)