लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा व 'दर्द से हमदर्द तक' ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा सदन येथे 'वकील आपल्या दारी' (लिगल ऐड ऑन व्हील्स) या उपक्रमाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांच्या मार्गदर्शनात जिल्हा न्यायाधीश-१ एस.ए.एस.एम.अली यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी वर्धा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश-१ एस.ए.एस.एम. अली, मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. एम. ठाकूर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव अॅड. विवेक देशमुख, सर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा कारागृह वर्ग १ चे अधीक्षक नितीन क्षीरसागर, वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. श्रीकांत शेंडे, लोक अभिरक्षक, पॅनल अधिवक्ता, विधी स्वयंसेवक यांच्यासह अनेक वकिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
'दर्द से हमदर्द तक' ट्रस्ट संस्थेचे संस्थापक मुंबई उच्च न्यायालयाचे अॅड. प्रकाश साळसिंगीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 3 वर्षांपासून ही संस्था गरजूंना मोफत सल्ला देण्याचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात करीत आहे. प्रामुख्याने मुंबई आणि पुणे या शहरात संस्थेचे कार्य अधिक प्रभावी आहे. महाराष्ट्रात वकील आपल्या दारी (लिगल एड ऑन व्हील्स) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने हा उपक्रम विदर्भातील अकोला येथून सुरू करण्यात आला असून, येत्या १५ दिवसांपर्यंत हे वाहन गाडी संपूर्ण विदर्भात मोफत सल्ला देत प्रवास करणार आहे. या प्रवासात अॅड. विभव दीक्षित हे विदर्भ प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
यांची होती उपस्थितीकार्यक्रमाला 'दर्द से हमदर्द तक' संस्थेचे विभव दिक्षीत, अॅड. विवेक निषाद, अॅड. संकेत राव, अॅड. चेतन मोहगावकर, राम फरांडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन श्रीकांत पवार यांनी, तर आभार अॅड. प्राची भगत यांनी मानले.
"जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व दर्द से हमदर्द तक या संस्थेने संयुक्त विद्यमाने काम केल्यास वर्धा जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोहोचवून विधी सेवा प्राधिकरणचे उद्दिष्ट साध्य करता येईल. याचा फायदा नागरिकांना निश्चित होईल."- एस.ए.एस.एम. अली, जिल्हा न्यायाधीश-१