लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार करणे आवश्यक आहे. प्रचारासाठी प्रामुख्याने विविध प्रकारच्या वाहनांचा उपयोग केला जातो. कोणत्या वाहनाचे दर दिवसाला किती रुपये भाडे राहील, हे निवडणूक विभागाने निश्चित केले आहे. त्यानुसार टाटा सुमो, बोलेरो, काळी-पिवळी, जीप यांचे इंधनासह प्रति दिवसाचे भाडे ३ हजार ८०० रुपये तर बैलगाडी, घोडगाडी प्रतितास २ रुपये दर ठरविण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक विभाग याकडे लक्ष ठेवणार असून त्यानुसार उमेदवारांचा खर्च निश्चित केला जाणार आहे.
निवडणुकीदरम्यान मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवाराला प्रचार करावा लागतो. यासाठी वाहने भाड्याने घेऊन त्यावर ध्वनिक्षेपक लावला जाते. तसेच बॅनर, पोस्टर व वाहनाला बॅनर, पोस्टर बांधून उमेदवार प्रचार करतात. निवडणुकीदरम्यान खर्चाची मर्यादा पाळणे उमेदवाराला आवश्यक आहे. यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत ४० लाख रुपयांची मर्यादा देण्यात आली आहे. दर दिवशीचा खर्च उमेदवाराला निवडणूक विभागाकडे सादर करावा लागतो. खर्चाची मर्यादा ओलांडल्यास तो उमेदवार निवडून येऊनही त्याचे पद धोक्यात येण्याची शक्यता असते. कोणत्या वाहनासाठी किती रुपये दर राहणार आहे, हे ठरविण्याचा अधिकार निवडणूक विभागाला आहे. संबंधित उमेदवाराने त्या वाहनधारकाला कितीही रुपये दिले तरी निवडणूक विभागाकडे खर्च सादर करतेवेळी निवडणूक विभागाने ठरवून दिलेल्या दरानेच खर्च सादर करायचा असतो. निवडणूक खर्चाचा हिशेब जुळवताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी निवडणूक विभागाने जवळपास सर्वच प्रकारच्या वाहनांचे दर ठरवले आहेत. सोबतच इंधनासह व इंधनाशिवाय असेसुद्धा वर्गीकरण केले आहे. त्यानुसार निवडणूक खर्च विभागाला सादर करणे आवश्यक आहे.
सायकल रिक्षा प्रतितास दोन रुपयांत कुठे मिळते सााहेब? काही उमेदवार शहरात सायकल रिक्षाच्या माध्यमातून प्रचार करतात. त्यासाठी इंधन लागत नसल्याने त्याचे भाडे कमीच ठेवण्यात आले आहे. निवडणूक विभागाने सायकल रिक्षा, घोडागाडी, बैलगाडी, सायकल यासाठी प्रतितास केवळ २ रुपये भाडे ठरविले आहे. ४०० रुपये दिवसाची मजुरी दिल्याशिवाय मजूर मिळत नाही. अशा स्थितीत सायकल, सायकल रिक्षा, बैलगाडी केवळ दोन रुपये प्रतितास या दराने मिळणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
४० सिटर प्रवासी वाहनाचे भाडे दहा हजार रुपये४० सिटर प्रवासी वाहनाचे इंध- नाशिवाय दिवसाचे भाडे ७ हजार ७०० रुपये तर इंधनासह १० हजार ४०० रुपये ठरविण्यात आले आहे. १८ सिटर वाहनासाठी दिवसाचे इंधनाशिवाय भाडे ४ हजार ६२५ रुपये तर इंधनासोबत भाडे ५ हजार ७६० रुपये ठरविले आहे. ५० सिटर वाहनाचे इंधनासोबतचे भाडे १२ हजार १५० रुपये ठरविण्यात आले आहेत.
ऑटोरिक्षा एक हजार रुपये दिवस ऑटोरिक्षाच्या माध्यमातूनही प्रचार केला जातो. निवडणूक विभागाने इंधनासह ऑटोरिक्षाचा दर प्रतिदिवस एक हजार रुपये, सायकल रिक्षा प्रतितास २ रुपये, दुचाकी प्रतितास २० रुपये ट्रॉलीसोबत ट्रॅक्टर प्रतिदिवस ३ हजार रुपये दर ठरविला आहे.
मालवाहू वाहनासाठी पाच हजार रुपये मालवाहू हलक्या वाहनाचे इंधनासह भाडे ५ हजार २६० रुपये ठरविले आहे. १० चाकी वाहन असल्यास १२ हजार ८०० रुपये, १२ ते १४ चाकी वाहन १३ हजार ६०० रुपये, १६ चाकी वाहनाचे भाडे १५ हजार ७०० रुपये ठरविले आहेत. त्यानुसार निवडणूक खर्च सादर करावा लागेल.