वर्धा : वर्धेच्या हनुमान टेकडी आयटीआय कॉलेजजवळील निसर्गसेवा समितीच्या ऑक्सिजन पार्कच्या धर्तीवर कर्नाटक राज्याच्या होसपेट जिल्ह्यात प्रकल्प राबविला जाणार आहे. होसपेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व वर्धेचे सुपुत्र हर्षल नारायणराव भोयर यांनी नुकतीच ऑक्सिजन पार्क प्रकल्पाला भेट दिली. येथील विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.
पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विराण टेकडीवर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी निसर्गसेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी त्यांना या प्रकल्पातील सर्व वृक्षवल्लींची माहिती दिली. निसर्गसेवा समितीने ८० प्रकारचे विविध वृक्ष येथे लावले आहेत. तसेच वृक्ष वाचनालय हा अभिनव उपक्रमही येथे राबविला जात आहे. याशिवाय बीज संकलन करून नर्सरी तयार करण्यात आली आहे. हा रोप, घनवन प्रकल्प असा हा २५ वर्षांचा प्रवास असून विराण ते हिरवी टेकडी ही सर्वांच्या सहकार्याने तयार झाली आहे, अशी माहिती भोयर यांना बेलखोडे यांनी दिली.
या वेळी होसपेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी कर्नाटक राज्याच्या होसपेट भागात शासकीय योजनेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे हे मॉडेल उभे केले जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
वर्धेचे सुपुत्र आहेत हर्षल भोयर
- माजी न्यायाधीश नारायण व पुष्पा भोयर यांचे सुपुत्र असलेले हर्षल भोयर हे वर्धेचे रहिवासी आहेत. पुण्याच्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून आयपीएससाठी त्यांची निवड झाली. पोलीस विभागाची नोकरी सांभाळून त्यांनी आयएएसची तयारी करून परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांना कर्नाटक राज्याच्या होसपेट येथे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.