हिंगणघाट (वर्धा) : चंद्राच्या दिशेनं झेपावलेलं भारताचं चंद्रयान-३ चंद्रावर यशस्वीरित्या उतरले आणि संपूर्ण देशाने जल्लोष केला. अनेक ठिकाणी फटाके, आतषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक मोहिमेत हिंगणघाटच्या कन्येचाही मोलाचा वाटा आहे. हिंगणघाट येथील कोमल करवा (लोहिया) हिची चंद्रयान मोहिमेतील भूमिका महत्त्वाची ठरली असून, तिने अभियंता म्हणून जबाबदारी बजावली आहे. सध्या ती इस्रोत शास्त्रज्ञ एस. डी. या पदावर कार्यरत आहे.
चंद्रयान-३ कडून मिळणारी छायाचित्रे आणि रोवर सेंसरच्या साहाय्याने उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे संशोधन करण्याची जबाबदारी इस्रोच्या ज्या चमूची आहे, त्यात कोमलचा सहभाग आहे. चांद्रयानाच्या यशस्वी लँडिंग नंतरचा हा महत्त्वाचा टप्पा आहे.
कोमल ही हिंगणघाट येथील व्यापारी नंदकिशोर करवा यांची कन्या आहे. बालपणीच पितृछत्र हरपलेल्या या मुलीचा सांभाळ आईने केला. कोमलच्या शिक्षणासाठी या मायमाउलीने प्रचंड परिश्रम घेतले. कोमल हिला उत्तम शिक्षण मिळावे यासाठी तिचे काका नारायण करवा व ब्रिजमोहन करवा तसेच भाऊ गणेश करवा यांचेही योगदान महत्त्वाचे ठरले.
इस्रोत २०१७ मध्ये झाली रुजू
कोमल हिने जी. बी. एम. एम. विद्यालयातून बारावी उत्तीर्ण केली. त्यावेळी तिने गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान पटकाविला होता. त्यानंतर तिने गुरू गोविंदसिंग कॉलेज, नांदेड या शासकीय महाविद्यालयातून बी. ई.ची पदवी घेतली. त्यानंतर एन. आय. टी., अलाहाबाद येथे एम. टेक. पूर्ण केले. तिने चमकदार कामगिरी करून सुवर्णपदकाचीही कमाई केली होती. त्यानंतर २०१७ मध्ये तिची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे अभियंता म्हणून निवड झाली. तिने परीक्षेत संपूर्ण देशातून अकरावा रँक मिळविला होता. सध्या ती इस्रोमध्ये ‘शास्त्रज्ञ एस. डी.’ या पदावर कार्यरत आहे.
चांद्रयान -२ मध्येही होता सहभाग
उच्चशिक्षणात सुवर्ण पदकासह ती बंगळुरू येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे अभियंता म्हणून रुजू झाली. येथे रुजू होताच चांद्रयान -२ मोहिमेतही तिने आपले योगदान दिले होते. यानंतर चांद्रयान-३ मध्येही तिचा सक्रिय सहभाग आहे. आता तर नंतरच्या संशोधनाची जबाबदारी तिच्या चमूवर आहे.