लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी/देऊरवाडा : ‘मी खेळायला जातोय’ असे सांगून घराबाहेर पडलेल्या दोन युवकांनी थेट शेतातील विहीर गाठली. याच विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना रविवारी सकाळी नजीकच्या शहापूर शिवारात उघडकीस आली असून देवांशू नीलेश घोडमारे (१४) रा. आसोलेनगर व युगंधर धर्मपाल मानकर (१५) रा. साईनगर अशी मृत युवकांची नावे असून, हे दोघेही तपस्या इंग्लिश स्कूलमध्ये नववीचे शिक्षण घेत होते.खेळायला जातो, असे सांगून घराबाहेर पडलेले, रात्री उशीर होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. पण ते न मिळाल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांकडूनही मुलांचा शोध घेतला जात असतानाच रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शहापूर शिवारात शेतात काम करीत असलेले मजूर विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिसरातील नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढून मृतांची ओळख पटविली. तेव्हा ते दोघेही तपस्या इंग्लिश स्कूलमधील नववीचे विद्यार्थी असल्याचे पुढे आले. मृतकांची ओळख पटल्यावर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी आर्वी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
बंद मोबाईल ठरला शोध घेण्यात अडथळा- देवांशू हा शनिवारी दुपारी ५ वाजता क्रीडा संकुलाच्या मैदानावर खेळाला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. रात्री ८ वाजले पण तो घरी न परतल्याने व शोध घेऊन त्याची माहिती न मिळाल्याने देवांशूच्या कुटुंबीयांनी आर्वी पोलीस स्टेशन गाठले. अल्पवयीन मुलगा बेपत्ता असल्याची माहिती मिळताच पोलिसांनीही आपल्या हालचालींना गती देत देवांशू जवळील मोबाईलच्या आधारे त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण मोबाईलच बंद येत असल्याने व अखेरचे लोकेशन मोहन रेस्टॉरन्ट येत असल्याने पोलीसही हतबल झाले होते. अशातच रविवारी सकाळी देवांशूचा मृतदेह विहिरीत सापडला.
अशी उघडकीस आली घटना- रविवारी माटोडा-बेनोडा मार्गावरील मौजा शहापूर शिवारातील राजेश गुल्हाणे यांच्या शेतात काम करीत असलेले मजूर पाणी पिण्यासाठी विहिरीवर गेले. त्यांनी विहिरीत डोकावून पाहले असता त्यांना एका युवकाचा मृतदेह निदर्शनास आला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनीही घटनास्थळ गाठून विहिरीच्या पाण्यात तरंगत असलेला एक तर गाळात अडकलेला दुसरा, असे एकूण दोन्ही मृतदेह विहिरीबाहेर काढले. तसेच मृतांची ओळख पटविली. शिवाय पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.
देवांशूची आई अंगणवाडी पर्यवेक्षिका, तर युगंधरचे आईवडील शिक्षक
- देवांशू घोडमारे याची आई अंगणवाडी पर्यवेक्षिका, तर वडील शेतकरी आहेत. शाळेतील हुशार विद्यार्थी असलेला देवांशू आपल्याला तर डॉक्टरच व्हायचे आहे, असे तो नेहमीच अनेकांना सांगायचा. पण या घटनेमुळे घोडमारे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.- युगंधर मानकर याचे आईवडील शिक्षक आहेत. युगंधरचे वडील इगतपुरी येथे विपशना प्रशिक्षण केंद्रात गेले होते. त्यांना ही दुःखद माहिती भ्रमणध्वनीवरून देण्यात आली.
कुटुंबीयांना न सांगताच जायचे शेतातील विहिरीवर पोहायला- कुटुंबीयांना कुठलीही माहिती न देता ही दोन्ही मुलं मागील काही दिवसांपासून गुल्हाणे यांच्या शेतातील विहिरीत पोहायला जात होती. पण शनिवारी पोहण्यासाठी दोराच्या साह्याने विहिरीत उतरलेल्या या दोन्ही मुलांवर काळाने झडपच घेतली. या दोन्ही मुलांच्या मृत्यूमुळे आर्वी शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास आर्वीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर करीत आहेत.