महेश सायखेडे, वर्धा: ऑनलाइन पद्धतीचा वापर करून शासनाच्या विविध योजनांच्या माहितीसह कुठल्या विभागात कोण अधिकारी आहे याची माहिती घरबसल्या नागरिकांना मिळावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून जिल्हा प्रशासनाचे वर्धा डॉट जीओवी डॉट इन हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. पण, याच संकेतस्थळावर वर्धा जिल्ह्यातून बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांचे नाव अजूनही कायम असल्याने जिल्हा प्रशासनाला बदललेल्या अधिकाऱ्यांचा मोह कायमच आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. वर्धा जिल्हा प्रशासनाच्या संबंधित अधिकृत संकेतस्थळावर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांसह जिल्ह्याचा इतिहास आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर जिल्ह्याविषयी यावर क्लिक केल्यावर जिल्ह्यातील तिन्ही महसूल उपविभागात कुठला अधिकारी कुठल्या पदावर कार्यरत असल्याची माहिती नागरिकांना सहज मिळते. पण, जिल्हा प्रशासनाच्या याच संकेतस्थळावर जिल्ह्यातून बदलून गेलेल्या दोन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांची नावे कायम असल्याने जिल्हा प्रशासनाच्या कार्यप्रणालीविषयी नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कुठे काय चुकीचे कायम?
*वर्धा उपविभाग*
*महसूलच्या वर्धा उपविभागात वर्धा, देवळी आणि सेलू हे तीन तालुके येतात. या उपविभागातील उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांची नागपूर येथे बदली होऊनही संकेतस्थळावर बगळे यांचे नाव कायम आहे. विशेष म्हणजे सुरेश बगळे यांच्या जागी दीपक करंज हे वर्धा उपविभागीय महसूल अधिकारी म्हणून एक महिन्यांपूर्वी रुजूही झाले आहेत.
*वर्धा उपविभागात देवळी तालुक्याचा समावेश असून, देवळीचे तहसीलदार राजेश सरवदे यांची देवळी येथून बदली झाली. त्यांनी परभणी येथे आपले कर्तव्य बजावण्यास सुरुवातही केली आहे. शिवाय त्यांच्या जागी देवळी येथे सचिन यादव हे तहसीलदार म्हणून रूजू झाले आहे. पण, वर्धा जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर देवळीचे तहसीलदार म्हणून राजेश सरवदे अजूनही कायम आहे.
*सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनोने यांची बदली झाल्यावर सुरुवातीला नायब तहसीलदार नितीन गौर यांच्याकडे सेलूचे प्रभारी तहसीलदार म्हणून जबाबदारी देण्यात आली, तर नंतर सेलू तालुक्याला महेंद्र सूर्यवंशी हे कायमस्वरूपी तहसीलदार मिळाले. पण, त्यांचा सेलू येथील कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली झाली. त्यांच्या जागी स्वप्निल सोनवणे हे सेलूचे नवीन तहसीलदार म्हणून रुजूही झाले आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर सेलूचे प्रभारी तहसीलदार म्हणून नितीन गौर यांचेच नाव कायम आहे.
*आर्वी उपविभाग *
* महसूलच्या आर्वी उपविभागात आर्वी, आष्टी आणि कारंजा या तीन तालुक्यांचा समावेश आहे. आर्वी येथील उपविभागीय महसूल अधिकारी हरीश धार्मिक यांची बदली होत त्यांच्या जागी विश्वास शिरसाट यांनी आर्वी उपविभागीय महसूल अधिकारी म्हणून जबाबदारीही स्वीकारली. पण, जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर हरीश धार्मिक यांचे नाव अजूनही कायम आहे.
* आर्वीचे तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांची बदली झाल्यावर सुरुवातीला प्रभारी तहसीलदार म्हणून नायब तहसीलदार माने यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली, तर शनिवारपर्यंत विनायक महामुनी यांनी आर्वीचे तहसीलदार म्हणून जबाबदारी सांभाळली. ते सोमवारी परिविक्षाचा एक भाग म्हणून हिंगणघाट येथे उपविभागीय महसूल अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर आर्वीचे तहसीलदार म्हणून विद्यासागर चव्हाण यांचे नाव कायम आहे. विशेष म्हणजे आर्वीला अजूनही कायमस्वरूपी तहसीलदार मिळालेला नाही.
* कारंजा (घा.) येथे तहसीलदार म्हणून ऐश्वर्या गिरी म्हणून रुजू झाल्या आहेत. पण जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर कारंजाचे प्रभारी तहसीलदार म्हणून दिलीप राऊत यांचे नाव कायम आहे.
* हिंगणघाट उपविभाग *
* हिंगणघाट महसूल उपविभागात हिंगणघाट आणि समुद्रपूर या दोन तालुक्याचा समावेश आहे. समुद्रपूरचे तहसीलदार राजू गणवीर यांची बदली होत त्यांच्या जागी कपिल हटकर हे समुद्रपूरचे नवीन तहसीलदार म्हणून रुजू झाले आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर समुद्रपूरचे तहसीलदार म्हणून राजू गणवीर यांचे नाव कायम आहे.