सटवाजी वानोळे लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सात हजारांहून अधिक युवकांना सहा महिन्यांकरिता रोजगार उपलब्ध करून दिला. आता या योजनेचा कार्यकाळ संपत आहे. परंतु या लाडक्या भावांचे पुढे काय? असा प्रश्न निर्माण झाला असून या सुशिक्षित युवकांवर पुन्हा बेरोजगारीची टांगती तलवार लटकते आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेरोजगार युवकांच्या हाती काम देण्यासाठी लाडका भाऊ योजना आणली होती. या योजनेअंतर्गत युवकांना सहा महिन्यांकरिता विविध सरकारी कार्यालय व खासगी आस्थापनात काम देण्यात आले होते. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दीड हजारांपेक्षा जास्त युवकाची निवड करण्यात आली. सहा ते १० हजार रुपये या अल्प मानधनावर त्यांना कामही देण्यात आले. परंतु या सहा महिन्यांच्या काळात काही लोकांचे वेतन झाले तर काहींना अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे. आज ना उद्या देईल अशी आशा उराशी बाळगून असतानाच सहा महिन्यानंतर पुढे काय असा प्रश्न उभा ठाकला आहे. अशातच या युवकाचा आता कार्यकाळ संपत चाललेला आहे.
हजेरीत त्रुटी असल्याने लागतोय वेळ आस्थापनांकडून प्राप्त हजेरीवरून मानधन अदा केले जाते. मात्र यात बऱ्याच आस्थापनांकडून हजेरी नोंदीत त्रुटी आढळून आल्याने त्या दुरुस्तीसाठी वेळ जातो आहे. शिवाय काहींचे बँकेत केवायसी अपडेट नसल्याने तर काहींचे आधार लिंक नसल्याने मानधन देण्यास दिरंगाई होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
नवीन जीआरला दुजोरा या संदर्भात वरिष्ठ स्तरावर रफ ड्राफ्टिंग सुरू आहे. आयुक्त, सहायक आयुक्त यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले असून लवकरच या संदर्भात नवीन जीआर निघणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या संदर्भात अधीकृत माहिती अद्याप नसल्याचे सांगण्यात आले.
तीन महिन्यांपासून अनेकांचे रखडले मानधन सहा महिन्यांपूर्वी रोजगार मिळालेल्या बेरोजगारांपैकी बऱ्याच सुशिक्षित बेरोजगारांचे मानधन गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेले आहे. यात आस्थापनांनी हजेरीची नोंद करताना चुका केल्याने हे मानधन रखडल्याचे सांगण्यात आले आहे. तर काहींची बँक केवायसी झाली नसल्याने हे मानधन झाले नसल्याचे सागंण्यात आले आहे. रखडलेले मानधन तातडीने द्यावे या संदर्भात युवकांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले आहे. मात्र यावर अद्याप सकारात्मक निर्णय झाला नाही.
१६५७ युवकांच्या हाताला कामया योजनेअंतर्गत शासकीय, तसेच खासगी आस्थापनात रिक्त असलेल्या जागांसाठी शिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देण्यात आ. यात शासकीय विभागात १ हजार २३५ तर खासगी आस्थापनांत ४२२ अशा १६५७ जणांना काम मिळाले.
"ज्या आस्थापनात योजनेअंतर्गत युवकांना रोजगार दिला आहे. त्या आस्थापनांकडून सेवा दिल्याचे त्यांना अनुभव प्रमाणपत्र देऊन सेवा समाप्त केली जाणार आहे. तर नव्या बेरोजगारांना याठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे." - नीता अवघड, सहायक कौशल्य विकास वर्धा.