लोकमत न्यूज नेटवर्क सेलू: कंबरेला कापडाचा पोलका बांधून त्यात रासायनिक खत भरायचे. प्रत्येक कपाशीच्या झाडाच्या बुडात टोकदार विळ्याने खड्डा करून ते त्यात टाकायचे. खत टाकून झाले की त्यावर माती लोटायची, ही कामे सध्या शिवारात सुरू आहेत. काही शेतकऱ्यांचा कपाशीला खत देण्याचा तिसरा, तर काहींचा चौथा फेर सुरू आहे. थोडाफार पाऊस आल्याने शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.
कपाशीचे बियाणे जमिनीत टाकण्यापासून तर कपाशी वेचण्यापर्यंत महिला मजुरांची मोठी गरज पडते. दिवसभर कंबरेला बाक देऊन ही कामे महिलाच करू शकतात. त्यामुळे महिला मजुरांची जास्त गरज पडते. सध्या शेतशिवारात हे काम करण्यासाठी मजूर उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. महिला बचतगटांचे मेळावे, राजकीय कार्यक्रमात महिलांचा सहभाग, लाडकी बहीण योजना, बांधकाम मजूर भांडे वाटप, अशा विविध ठिकाणी महिला जात असल्याने शेतात काम करण्यासाठी वेळेवर मजूर मिळत नाहीत.
सध्या मोठ्या प्रमाणात तालुकास्तरावर विविध योजनांचे लाभ पदरात पाडून घेण्यासाठी महिलांची गर्दी असते. उन्हात काम करण्याची महिलांची सवय आता कमी होत चालली असली तरी त्यात उन्ह अलीकडे उन्हाळ्यासारखे तापत असून सर्वांना घामाघूम करीत आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांना शेतात काम करण्यासाठी महिला मजुरांची गरज भासते. मजुरांच्या उपलब्धतेनुसार कामे उरकून घ्यावी लागतात. सध्या शेतात कपाशीला खत देण्याचे काम सुरू असून शेतकऱ्यांचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे. खर्च जास्त आणि भाव कमी, यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी शेवटी निराशाच पडत आहे. आपला पिढीजात व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांना शेतीत राबावेच लागते. हे मात्र तेवढेच खरे.