सिंदी (रेल्वे) : साखरेची पोती घेऊन छत्तीसगडकडे जात असलेल्या भरधाव ट्रकचा अचानक टायर फुटला. अनियंत्रित झालेला ट्रक रस्त्याच्या बाजूला लावत असतानाच अचानक आगीचा भडका उडाल्याने चालक-वाहकांनी उड्या मारून आपले प्राण वाचविले. परंतु ट्रकसह ३५ टन साखरेची राख झाली. हा अपघातवर्धा ते नागपूर महामार्गावर आमगाव-खडकीजवळ आज मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता झाला.
मंगळवेढा-पंढरपूर येथील फास्टट्रॅग कंपनीतून साखरीची पोती भरून (सी.जी.०८ ए.एक्स. ८११०) क्रमाकांचा ट्रक राजनांदगाव-छत्तीसगड येथे जात होता. वर्धा ते नागपूर महामार्गावरील प्रवासादरम्यान आमगाव-खडकी येथील नर्सरीजवळ अचानक या धावत्या ट्रकचा टायर फुटला. त्यामुळे अनियंत्रित झालेल्या ट्रकवर चालकाने नियंत्रण मिळवून मार्गाच्या बाजीला ट्रक लावण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात अचानक ट्रकने पेट घेतल्यामुळे चालक अशरफ सय्यद व वाहक महेंद्र निगनाथ या दोघांनीही बाहेर उड्या मारल्या. त्यामुळे दोघेही सुखरूप बचावले असून ट्रकसह ३५ टन साखर जळाली. याप्रकरणी सिंदी (रेल्वे) पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.