वर्धा : लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा टायर फुटल्याने ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन रस्ता कडीला उलटली. अपघात चांदणी फाट्याजवळ शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास झाला. यामध्ये सुमारे 15 प्रवासी जखमी झाल्याची माहिती खरांगणा पोलिसांनी दिली.
प्राप्त माहितीनुसार, अमरावती येथून लग्न सोहळा आटोपून वराती ट्रॅव्हल्स ने देवळी तालुक्यातील काजळी गावाकडे जात होती. भरधाव ट्रॅव्हल्स चा अचानक टायर फुटल्याने चालकाची स्टेरिंग वरून नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स उलटली. ट्रॅव्हल्स मध्ये जवळपास 40 वराडी प्रवास करीत होते. यापैकी पंधरा प्रवाशी किरकोळ जखमी झाले. सर्व जखमींना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. जखमींमध्ये मंगल रामसिंग राठोड,नारायण गुलाब राठोड, पिंटू चव्हाण, अंकुश काशिनाथ राठोड, बळवंत पवार, ललित राजू राठोड यांच्यासह काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती खरांगणा पोलिसांनी दिली.
खरांगना पोलीस अपघात स्थळी दाखल
चांदणी फाट्याजवळ ट्रॅव्हल्स चा अपघात झाल्याची माहिती खरांगना पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांनी अपघातस्थळी धाव घेतली. पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्व जखमींना तत्काळ सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारर्थ दाखल केले तर काहींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.