वर्धा : विदर्भ, मराठवाड्यासाठी वरदान ठरणाऱ्या बहुप्रतीक्षित वर्धा-यवतमाळ-नांदेड नवीन रेल्वे मार्गावर वर्धा ते कळंबपर्यंत रेल्वे सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. वर्धा ते यवतमाळ जिल्ह्यातील कळंब स्टेशनपर्यंत देवळी ते कळंब अशी २३.६९ किमी मार्गाची सुरक्षा चाचणी नुकतीच २२ डिसेंबरला पूर्ण झाली होती. आता प्रत्यक्ष रेल्वे सुरू करण्यासाठी १२ जानेवारीचा मुहूर्त काढण्यात आल्याची माहिती आहे.
तत्कालीन राज्यसभा सदस्य आणी ‘लोकमत’ एडोटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांच्या पाठपुराव्यानंतर ११ फेब्रुवारी २००९ रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते यवतमाळ येथे या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन झाले होते. सध्या या मार्गाचे ४७ टक्के काम पूर्ण झाले आहे. २२ डिसेंबरला रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अवनिशकुमार पांडे, डीआरएम (नागपूर) तुषारकांत पांडे यांनी देवळी ते कळंब या लाइनची पाहणी केली होती. ताशी १२५ किमी वेगाने सुरक्षा चाचणी घेण्यात आली होते. रेल्वेचे सुरक्षा आयुक्त मनोज आरोरा यांनी पाहणीनंतर या मार्गाला सुरक्षा प्रमाणपत्रही बहाल केले होते.
या मार्गासाठी तीन हजार ४४५.४८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, आत्तापर्यंत एकूण एक हजार ९१०.७ कोटी निधी खर्च झाला आहे. दोन हजार १३८ हेक्टर क्षेत्रापैकी ८९ टक्के अर्थात एक हजार ९११ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. २८४.६५ किमीच्या या मार्गावर २६ स्थानके राहणार आहे. त्यापैकी चार स्थानकांची कामे पूर्ण झाली असून ३८.६१ किमीचा वर्धा-कळंब मार्ग पूर्ण झाला आहे. याच मार्गावर १२ जानेवारीला रेल्वे धावण्याची पूर्ण तयारी झाल्याची माहिती आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीव्दारे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्याचीही शक्यता आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने याला अधिकृत दुजोरा दिला नाही.
१० डब्यांची राहणार गाडीयेत्या १२ जानेवारीला सकाळी १०:०० वाजता कळंब रेल्वे स्थानकातून १० डब्यांची ही गाडी सुटणार असल्याची माहिती आहे. ती सकाळी ११:१० वाजता वर्धा येथे पोहोओल. हीच गाडी सायंकाळी ५:०० वाजता वर्धा येथून सुटून सायंकाळी ६:१० वाजतापर्यंत कळंब येथे पोहोचेल, असे सांगण्यात येते. मात्र, याबाबत रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी १२ जानेवारीचा मुहूर्त नक्की नसल्याचे स्पष्ट केले. तथापि, त्या दृष्टीने तयारी सुरू असल्याचे मात्र त्यांनी सांगितले.