वर्धा : ‘व्हायरल झालेल्या चॅटमध्ये सहभागी महिलेने नियुक्तीसाठी सात वेळा प्रयत्न केले होते; परंतु त्यांची अर्हता पूर्ण नसल्याने नियुक्ती होऊ शकली नाही. याचाच वचपा काढण्यासाठीच चारित्र्यहीनतेचा आरोप करणारा संदेश व्हायरल केला. त्यानंतर ही बदनामी थांबवण्यासाठी ४ कोटींची मागणी केली,’ असा खळबळजनक आरोप महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. रजनीशकुमार शुक्ल यांनी पत्रकार परिषदेत केला.
स्थानिक महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय एका वेगळ्याच कारणाने चांगलेच गाजत आहे. याप्रकरणी कुलगुरू प्रा. रजनीश कुमार शुक्ल यांनी गुरुवारी पत्रपरिषद आयोजन करून आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, ‘दिल्लीत राहणारी महिला आपली नियुक्ती मिळवण्यासाठी दबाव आणत होती. तसे न केल्याने तीने दिल्लीत राहणाऱ्या माझ्या मुला-मुलीशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांच्याशी आमचे व्हॉटस्ॲप चॅट फॉरवर्ड करून ४ कोटी रुपयांची मागणी केली.
महिलेने व्हायरल केलेले काही चॅट्स माझे आहेत; पण त्यांचाही विपर्यास करण्यात आला आहे. महिलेने ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न केला. मात्र, या दबावापुढे कुटुंब तटस्थ राहिले. अखेर तिच्याकडून ५० लाखांची मागणी आली. तिने तिचे बँक डिटेल्सही पाठवले तरीही आम्ही डगमगलो नाही. व्हायरल झालेल्या संदेशाबाबत मी रामनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्याचा तपास नुकताच सुरू झाला आहे. मात्र, पोलिस तपासाचा निकाल येण्यापूर्वीच मला दोषी ठरवून माझा राजीनामा मागितला जात आहे, असेही कुलगुरू म्हणाले. त्यांच्यावर असलेल्या आरोपांचे खंडन करताना पत्रकार परिषदेत उपस्थित त्यांची पत्नी, मुलगा व मुलगी हे संपूर्ण कुटुंब भावुक झाले होते.
चुकून डासरोधक द्रव पिण्यात आले
दिल्लीत २६ जूनला बैठक असल्याने ती बैठक आटोपून हिंदी विश्वविद्यालयात परत आलो. प्रकृती ठीक नसल्याने शरीरातील साखर नियंत्रणात आणण्याकरिता आयुर्वेदिक औषधाचे सेवन केले. औषणात पाणी मिसळत असताना चुकून मी मच्छररोधक प्यायलो. ही बाब लक्षात येताच मी स्वत: सहकारी डॉ.जयंत उपाध्याय यांना सोबत घेऊन आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले. चुकून घेतलेले द्रव हा आत्महत्येचा प्रयत्न कसा असू शकतो, असा प्रश्नही कुलगुुरू प्रा. रजनीशकुमार शुक्ल यांनी उपस्थित करून रुग्णालय प्रकरणावर पडदा टाकला.