सेवाग्राम (वर्धा) : सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानअंतर्गत खादी ग्रामोद्योग भांडारातील खादी विक्रीला आयोगाचे मान्यता प्रमाणपत्र नसल्याने ते तत्काळ बंद करण्याच्या सूचना पत्रातून केल्या होत्या. यावर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने आश्रमात महात्मा गांधींच्या काळापासून खादीचे कार्य सुरू असल्याने ते बंद करणार नाही. तुम्हाला कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे उत्तर आश्रमचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू व मंत्री चतुरा रासकर यांनी आयोगाच्या नागपूर विभागीय कार्यालयाला पत्राद्वारे पाठविले आहे.
सेवाग्राम आश्रमात गांधीजींच्या काळापासून कताई, बुनाईची कामे सुरू आहेत. निर्मित खादी वस्त्र आश्रमातील दुकानातून विक्री केले जाते. हे काम आयोगाच्या स्थापनेच्या पूर्वीपासून केले जात आहे. तसेच मान्यताप्राप्त खादी संस्थेतील खादी आवश्यकता आणि मागणीनुसार खरेदी करून विक्री केली जाते. खादी मार्क रेग्युलेशन २०१३ विरुद्ध संस्था कुठलेही कार्य करीत नाही. आश्रमाविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा आपण दिलेला असल्याने याबाबत आपणास स्वातंत्र्य असल्याचे मेलद्वारा निर्देशक विभागीय कार्यालय नागपूर यांना पत्रातून कळविले आहे. याबाबतचे पत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी, खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई, निदेशक (खादी व विपणन) खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई यांनाही पत्र पाठविण्यात आलेले आहे.
आयोगाचे प्रतिनिधी आश्रमात
२५ मार्च रोजी खादी व ग्रामोद्योग आयोगाचे प्रतिनिधी आश्रमात आले असता, त्यांना खादी व ग्रामोद्योग भांडारातून अवैध खादीची विक्री करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले होते. तसे आयोगाचे प्रमाणपत्र नसल्याचे लक्षात आले होते. यासंदर्भात २८ मार्च रोजी विभागीय कार्यालयाने तत्काळ विक्री बंद करण्याच्या सूचना पत्रकातून दिल्या होत्या.
खादी व ग्रामोद्योग आयोग शासनाचा विभाग आहे. खादी आमच्यासाठी आदर्श असून, खादी मार्क आवश्यक आहे, असे आम्हाला वाटत नाही. खादीची शुद्धता आणि उद्देश महत्त्वाचा आहे. तो सफल व्हावा, अशी आमची इच्छा आहे.
टी. आर. एन. प्रभू, अध्यक्ष सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.