आॅनलाईन लोकमतवर्धा : भरदिवसा दरवाजा तोडून चोरट्याने घरातून रोख आणि सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला. बोरगाव (मेघे) परिसरात घडलेल्या या घटनेने परिसरात चांगलीच भीती निर्माण झाली आहे. या चोरीत चोरट्याने तब्बल १ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.या प्रकरणी घरमालाक ज्ञानेश्वर कोराते यांनी पोलिसात तक्रार केली. सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडलेल्या या चोरी प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर ठाण्यात कार्यवाही सुरूच होती. ज्ञानेश्वर कोराते हे सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात वाहतूक शिपाई म्हणून कार्यरत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर ठाण्यात कर्तव्यावर गेल्यानंतर शाळेची वेळ होताच त्यांचा मुलगा व मुलगी हे शाळेत गेले होते. याच वेळी शेजारच्या महिलेला तिच्या मुलाच्या शाळेत काही काम असल्याने जायचे आहे म्हणून ज्ञानेश्वरच्या पत्नीला सोबत चलता का म्हणण्याकरिता गेली होती. सौ. कोराते शेजारी महिलेसह शाळेत जाऊन परत येताच त्यांच्या घरी चोरी झाल्याचे लक्षात आले.चोरट्याने कोराते यांच्या घराचे दार तोडून घरात प्रवेश करीत कपाटातील रोख व सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेला. चोरट्याने पळविलेल्या मुद्देमालाची किंमत उशिरापर्यंत स्पष्ट झाली नव्हती. पोलिसांकडून त्याची माहिती घेणे सुरू आहे. चोरीची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यातील शशिकांत जयस्वाल, देवेंद्र कडू, यशवंत वाघमारे, किशोर ठाकरे यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या घटनेची शहर पोलिसांनी नोंद घेतली असून वृत्तलिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती‘रॉकी’च्या प्रयत्नांना अपयशचोरट्याचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. या श्वानासोबत पोलीस कर्मचारी बाबाराव कोकाटे व संजय देऊरकर यांनी घटनास्थळ गाठले. कोराते यांच्या घरापासून सुमारे १५ मिटरपर्यंतचा चोरट्याचा मार्ग याप्रसंगी रॉकीने दाखविला; परंतु, त्यापुढील मार्ग दाखविण्यात रॉकीच्या माध्यमातून झालेल्या प्रयत्नांना यश आले नाही.उलटसुलट चर्चेला उधाणचोरट्याने चक्क पोलीस कर्मचाऱ्याच्याच घरी दिवसाढवळ्या चोरी केल्याने सर्वसामान्य माणूस असुरक्षितच आहे, अशी चर्चा या घटनेमुळे परिसरात ठिकठिकाणी होत होती. इतकेच नव्हे तर नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरात गस्त वाढविण्याची मागणी होत होती.२० हजार रोखसह दीड लाखांचे सोने पळविलेचोरट्याने ज्ञानेश्वर कोराते यांच्या घरातून २० हजाराच्या रोखसह १ लाख ५३ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
पोलीस शिपायाच्या घरी चोरी; रोखेसह सोन्याचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 10:52 PM
भरदिवसा दरवाजा तोडून चोरट्याने घरातून रोख आणि सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला.
ठळक मुद्देबोरगाव (मेघे) परिसरातील घटना : नागरिकांत भीतीचे वातावरण