आॅनलाईन लोकमतवर्धा : राज्याचे मुख्यमंत्री आपण स्वत: शेतकरी असल्याचे सांगतात. शेती व शेतीशी संबंधीत गोष्टी माहिती असल्याचे सांगतात. दादा आपण एकदा परवानगी द्या, राज्याच्या मुख्यमंत्र्याना वर्षा बंगल्यावर गाईचे दूध काढायला लावतो, असा इशारा विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी हल्लाबोल पदयात्रेत मुख्यमंत्र्यांवर तोफ डागतांना वर्धा येथे दिला. वर्धा जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून राष्ट्रवादी कॉँग्रेसची पदयात्रा मुक्कामी आहे. जाहीर सभेमध्ये बोलताना धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली.विदर्भाने भाजपच्या पदरात मोठ्या जागा टाकल्या. मात्र विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष आहे, असा आरोप करताना धनंजय मुंडे म्हणाले की वर्धेच्या भूमितूनच महात्मा गांधींनी इंग्रजांना चले जावचा इशारा दिला होता. आता जनतेने देशातून भाजपला चले जावचा इशारा याच भूमीतून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.राज्यातील सरकार हे १५ वर्षांच्या नवसाने आले आहे. ते भ्रष्टाचाराच्या मुक्याने मरू नये, अशी टिकाही त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कर्ज माफी योजना जाहिर करून शेतकऱ्यांची फसवणूक करताना सरकारला लाज वाटत नाही, असे मुंडे म्हणाले. आज बुधवारी सहाव्या दिवशी वर्धा शहरातून पदयात्रा सेवाग्रामकडे रवाना झाली. तत्पूर्वी पदयात्रेतील मान्यवर नेत्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, बापूराव देशमुख यांच्या पुतळ्याला मालार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सेवाग्रामकडे यात्रा मार्गस्त झाली व सेवाग्राम आश्रमात मुक्काम करून गुरुवारी यात्रा पवनार मार्ग सेलू येथे थांबणार आहे.
यात्रेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष आ. सुनिल तटकरे, जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, हसन मुश्रीफ, सुरेश देशमुख, राजु तिमांडे, अॅड. सुधीर कोठारी आदी उपस्थित होते.