लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : युवकांमध्ये चिकाटी आणि चिकित्सक बुद्धीची आवश्यकता आहे. यासोबतच जीवनाचे स्वप्न साकार करण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, असे मत अशोक भारत यांनी व्यक्त केले.सेवाग्राम येथील नयी तालीम समिती परिसरातील शांती भवनामध्ये न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयातील समाजकार्य पारंगत विद्यार्थ्यांचे पाच दिवसीय ग्रामीण आकलन शिबिर सुरू आहे. या शिबिराचे अध्यक्ष म्हणून अशोक भारत बोलत होते. कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास, सहकार्य व सहजीवन या तत्त्वावर सामूहिक जीवन जगण्याचा अनुभव आणि अनुभूतीकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून बापू, मॉ-बाबा यांच्या तैलचित्राचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून सोमवारी या शिबिराला सुरुवात झाली. आज खऱ्या अर्थाने शिबिराची गरज असून, हे शिबिर आश्रम परिसरात असल्याने गांधी विचारांना समजून घेण्याची संधी मिळाली आहे, असे मत सर्व सेवा संघांचे महामंत्री गौरांग महापात्रा यांनी उद्घाटनीय भाषणातून व्यक्त केले. राम धिरण यांनी समाजशात्र हा विषय महत्त्वाचा आहे. याचे शिक्षण व ज्ञान बालपणापासून घरात मिळते. चांगला समाज घडविण्यासाठी या विषयाची नितांत गरज असल्याचे सांगितले. यावेळी नयी तालीम समितीचे कार्यालयमंत्री डॉ. शिवचरण ठाकूर यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शिबिरप्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर पुसदकर, संचालन प्रतिमा भिवगडे यांनी केले, तर आभार स्वप्नील भोयर यांनी मानले. या शिबिरात ६० विद्यार्थ्यांचा सहभाग असून, याकरिता प्रा. डॉ. निशांत चिकाटे, स्नेहा ठाकरे, निकिता रामटेके, युगंधरा गोडे व अनुसया आदी सहकार्य करीत आहे.