अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : बाकळी नदीवर ७५ लाख रुपये खर्च करून जलसंधारण विभागाने बंधाऱ्याचे बांधकाम केले; पण नियोजनाचा अभाव असल्याने या बंधााऱ्यात थेंबभरही पाणी दिसत नाही. यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याचेच दिसून येत आहे.आष्टी शहरातील मुलभूत सुविधा व स्मारकासाठी अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाच कोटी रुपयांचा निधी दिला होता. यातून तीन कोटींच्या आराखड्यात बाकळी नदीवरील पुलाचा समावेश होता. उर्वरित निधी रस्ते, नाल्याची संरक्षण भिंत, टेकडीवरील इदगाह फ्लोरिंग, स्मशानभूमीचे बांधकाम यावर खर्च करण्यात आले. बाकळी नदीवर बांधलेला बंधारा वजा पुलासाठी ७५ लाख रुपये खर्च केले. यातील ४० लाख खोदकामावर खर्च करून प्रचंड उधळपट्टी करण्यात आली. पुलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. कॉक्रीटचा वरील भाग आतापासूनच उखडत चालला आहे.गणेशतीर्थावर जाण्यासाठी असलेला रस्ता बूजविला असून उर्वरित रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. नगरपंचायत हद्दीत असलेली विद्युत लाईनचे नुकसान करण्यात आले आहे. या कामामुळे पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटली आहे. यामुळे आष्टीत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. केवळ देखावा निर्माण करून निधीची अफरातफर जलसंधारण विभागाकडून केली जात असल्याचे दिसते.संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत पाहणी करावी. बंधाऱ्याच्या बांधकामाची सखोल चौकशी करावी. तथा शासनाच्या निधीचा अपव्यय केल्या प्रकरणी संबंधितांवर कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.बंधारा वजा पुलाची डागडुजी विहित मुदतीत करावी. तोपर्यंत सुरक्षा ठेव रक्कम अदा करू नये. नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कंत्राटदारावर कारवाईचा ठराव घ्यावा. जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त भेट देऊन पाहणी करावी. ग्रामस्थांना असलेल्या सर्व समस्या मार्गी लावाव्यात, अन्यथा उपोषण करू असा इशारा नगरसेवक लेकुरवाळे यांनी तक्रारीतून दिला आहे.
७५ लाख खर्चूनही पाण्याचा थेंब नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 11:53 PM