केबलद्वारे तात्पुरती व्यवस्था : नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबविण्याची मागणीआष्टी (शहीद) : पेठ अमहदपूर ग्रामपंचायत अंतर्गत रसुलपूर वसाहतीत गत २० ते २५ वर्षांपासून रस्ते, नाल्या, विजेचा प्रश्न प्रलंबित आहे. सार्वजनिक विजेचे दिवे लावण्यासाठी उभ्या विद्युत खांबावर ताराची जोडणी अद्यापही करण्यात आली नाही. यामुळे केबल टाकून तात्पूरती विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ चालविल्याची तक्रार नागरिकांनी वरिष्ठांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पेठ अहमदपूर ग्रा.प. ची रसुलपूर वसाहत एक वॉर्ड आहे. येथे सर्व नोकरी करणारे कर्मचारी, शिक्षक तथा व्यावसायिक राहतात. मोठ्या प्रमाणात नळपट्टी व घर कर वसुली करून ग्रामपंचायतचा कारभार चालतो; पण नागरिकांना कुठल्याही सुविधा दिल्या जात नाही. ९० टक्के रस्ते निर्माणाच्या प्रतीक्षेत आहेत. नाल्यांचेही बांधकाम झालेले नाही. पथदिवेही अद्यापर्यंत तारांची जोडणी करून सुरू करण्यात आलेले नाही. नागरिकांनी वारंवार वीज तारा जोडून विद्युत पथदिवे कायम करण्याची मागणी केली; पण महावितरणकडून तात्पूरती व्यवस्था म्हणून केबलद्वारे रस्त्यावरील खांबावर पथदिवे लावण्यात आले आहेत. यानंतर आजपर्यंत या खांबावर विद्युत तारांची जोडणी करण्यात आलेली नाही. सदर केबल वादळ व उन्हामुळे खराब होऊन लोंबकळत आहेत. जमिनीपर्यंत लोंबकळत असलेले हे केबल अपघातास निमंत्रण देत असल्याचेच दिसते. केबलद्वारेच सिंगल फेज विजेची जोडणी करून देण्यात आली. यामुळे व्होल्टेजची समस्या उग्ररूप धारण करीत आहे. परिणामी, नागरिकांच्या घरातील टीव्ही, फ्रीज, कुलर, विहिरीवरील पाण्याच्या मोटारी यासह विजेवर चालणारी उपकरणे वारंवार जळत आहेत. याबाबत सहायक अभियंता कार्यालयाला रसुलपूर वसाहतीमधील नागरिकांनी निवेदन दिले. त्वरित थ्री फेज विद्युत जोडणी व खांबावर तार टाकून पथदिवे कायमस्वरूपी लावण्याची मागणी केली आहे. निवेदनावर दिनेश इंगळे, राजेंद्र कुरवाडे, गजानन बाळापूरे, राजीव ढोले, मोहन निंभोरकर, गुणवंत मानमोडे, समीर कोहळे, राजू चौरेवार, ओमप्रकाश होले, संजय तराळे, सुनील उगोकार, दिलीप पखाले, सुरेश कोल्हे आदींच्या सह्या आहेत. सर्व नागरिकांनी आतापर्यंत अनेकदा निवेदने दिली; पण कुठलिही कार्यवाही करण्यात आली नाही.(तालुका प्रतिनिधी)
रसूलपुरात वीज जोडणी केलीच नाही
By admin | Published: September 14, 2016 12:49 AM