लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/चिकणी (जामणी) : मागील वर्षीपासून सोयाबीन उत्पादकांसाठी खोडकीड कर्दनकाळ ठरत आहे. यावर्षी तरी सोयाबीनचे चांगले उत्पन्न होईल, अशी अपेक्षा होती. परंतु सुरुवातीलाच खोडकीड आणि व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षीही शेतकऱ्यांना सोयाबीन सवंगणीची वेळच येणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांनी मागील वर्षी कपाशीपेक्षा सोयाबीनचा पेरा वाढविला होता. परंतु सुरुवातीला अतिवृष्टीने दगा दिला. त्यानंतर खोडकीड व चक्रीभुंगाने आक्रमण केल्याने सोयाबीनचे पीक हातचे गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी उभ्या पिकांमध्ये नांगर चालविणे किंवा जनावरे सोडण्याचा निर्णय घेतला होता. काही शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्याकरिता सोयाबीनची मळणी केली असता लागवड खर्चही भरुन निघाला नाही. बहुतांश शेतकऱ्यांना मळणीकरिता खिशातून अतिरिक्त पैसे खर्च करावे लागले. गेल्या वर्षीचा धक्का लक्षात घेऊन यावर्षी सोयाबीनच्या लागवडीत कपात केली. परंतु यंदाही शेतकऱ्यांना पुन्हा त्याच संकटाचा सामना करावा लागत आहे. देवळी तालुक्यातील चिकणी, जामणी, पढेगाव व दहेगावसह इतरही गावांमध्ये सोयाबीनवर खोडकीडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पीक पिवळे पडायला लागले असून वाचविण्यासाठी धडपड सुरु आहे. वर्धा तालुक्यातही हीच परिस्थिती असून लगतच्या आष्टा येथील शेतकरी किशोर गुरनुले यांनी खोडकिडीच्या प्रादुर्भावाने दोन एकरातील सोयाबीनमध्ये नांगर चालविला.
पाण्याचा ताण, पुरेसा ओलावा नसताना तणनाशकाची फवारणी, चुनखडीयुक्त जमीन आदी कारणांमुळे सोयाबीन पिवळे पडत आहे. शेतकऱ्यांनी प्रादुभार्वाचा प्रकार लक्षात घेऊन चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या शेतात चिलेटेड फेरस सल्फेट किंवा मिश्र सुक्ष्म अन्नद्रव्य अधिक २ टक्के किंवा १९:१९:१९ या विद्राव्य खताची फवारणी करावी. तसेच खोडमाशी, चक्रीभुंगा, पांढरीमाशी याकरिता शिफारशीप्रमाणे कीटकनाशकाची फवारणी करावी.एस.एस. ढुमने, कृषी सहायक चिकणी/पढेगाव,
अडीच एकरात सोयाबीनची पेरणी केली. पेरणीही उत्तम प्रकारे साधली, पण कोवळी रोपटे असतानाच खोडकीड व व्हायरसचा प्रादुर्भाव झाला. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार फवारणी सुद्धा केलीत. तरीही पीक वाचवू शकलो नाही. यातील अर्धेअधिक झाडे नष्ट झालीत.भास्कर काकडे, शेतकरी चिकणी
गेल्यावर्षी आठ एकरात केवळ दीड क्विंटल सोयाबीन झाल्याने खर्चही निघाला नाही. यावर्षी दोन एकरामध्ये सोयाबीनची लागवड केली असता यंदाही खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला. परिणामी दोन एकरातील सोयाबीनवर नांगर चालवावा लागला. किशोर गुरनुले, शेतकरी,आष्टा