लोकमत मदतीचा हातसचिन देवतळे विरूळ (आ़)गरिबी हा माणसाला लागलेला शाप आहे. पोटाची आग माणसाला शांत बसू देत नाही. मरेपर्यंत पोटाची भुक शमविण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात़ यात म्हातारपण आले की, थकलेल्या शरीराने श्रम होत नाही. म्हातारपणात आपल्या मुलांकडून दोन वेळचे जेवण मिळावे, एवढीच अपेक्षा घेऊन अनेक वृद्ध माता-पिता जगत असतात; पण म्हातारपणात सोबतीला कुणीच नसेल तर पोटाची खळगी भरण्यासाठी असंख्य वेदना सहन कराव्या लागतात. अशाच ८० वर्षीय वृद्ध दाम्पत्याला उदरनिर्वाहासाठी २४ किमीची पायपीट करावी लागत असल्याचे समोर आले आहे़दहेगाव येथील खुशाल धकाते (८०) व त्यांची वृद्ध पत्नी छबू धकाते (७०) या दाम्पत्यांना मुल नाही. दोन मुली होत्या. यात एका मुलीचे निधन झाले तर दुसऱ्या मुलीचे लग्न झाले; पण नवरा सतत मद्यधुंद अवस्थेत मारहाण करीत असल्याने ती दहेगावला आपल्या वृद्ध आई-वडिलांच्या आधाराने जीवन जगत आहे. घरात अठराविश्वे दारिद्र्य, राहायला लहानसे घर असले तरी एवढ्या कुटुंबाचा भार ८० वर्षीय खुशाल यांना पेलावा लागतो़ संसाराचा गाडा हाकण्यासाठी या वृद्ध दाम्पत्याची सकाळी ४ वाजतापासून पायपीट सुरू होते. खुशाल व पत्नी छबू हे दहेगाव येथून १२ किमी पायदळ प्रवास करून दोघेही डोक्यावर मोळी घेऊन काठीच्या आधारे थरथरत्या अंगाने पुलगावला जातात़ पुलगाव येथे दोघांचीही मोळी १०० रुपयांत विकून ते परत दहेगावला पायदळ जातात. हे दृष्य पुलगाव ते दहेगाव मार्गावर पाहायला मिळते. वार्धक्यामुळे कोणतेच काम होत नाही; पण नाईलाज असल्याने या वयातही त्यांना काम करावेच लागते आणि दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करावी लागते. निराधार वृद्धांकरिता शासनाकडून अनेक चांगल्या योजना राबविल्या जातात; पण या वृद्ध दाम्पत्यांना अद्याप शासनाच्या एकाही योजनेचा लाभ मिळालेला नाही. साध्या निराधार योजनेतील अनुदानही त्यांना प्राप्त होत नाही. निराधार योजनेचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी अनेकांकडे आपली कैफियत मांडली; पण नेत्यांसह सर्वांनीच त्याकडे पाठ फिरविली. कुणीही त्यांना मदत केली नाही. आज गरज नसलेल्यांना निराधार योजनेचा लाभ मिळत आहे; पण या गरीब, वृद्ध दाम्पत्याना निराधार योजनेचा लाभ मिळू नये, हे दुर्दैवच म्हणावे लागेल़खुशाल व त्यांच्या पत्नीचे शरीर वार्धक्यामुळे पूर्णत: खंगले आहे. चालणे होत नाही. चालताना थकवा येतो. बसत-बसत पुलगाव ते दहेगाव हा बारा किमी जाणे व परत येणे, हा प्रवास त्यांना डोक्यावर मोळीचे ओझे घेऊन करावा लागतो़ हे दृश्य सर्वांच्या नजरेस पडते; पण कुणीही त्यांच्या मदतीला समोर येताना दिसत नाही़ या वृद्ध दाम्पत्याला कुणीतरी मदतीचा हात देऊन किमान शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे गरजेचे झाले आहे़