लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कामासाठी नालवाडी परिसरात खोदकाम केले जात आहे. याच खोदकामादरम्यान वर्धा शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने तसेच दुरूस्तीच्या कामाला सुमारे सात ते आठ दिवसांचा कालावधी लागणार असल्याने पुढील दहा दिवस वर्धा शहरातील नागरिकांना वर्धा न.प.द्वारे पाणी पुरवठा होणार नाही, असे पालिका प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रातून वर्धा शहराला पिण्या योग्य पाण्याचा पुरवठा होतो. त्यासाठी मुख्य जलवाहिनीही टाकण्यात आली आहे. परंतु, हिच जलवाहिनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान फुटली. ही जलवाहिनी अतिशय जुनी असून दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. परंतु, दुरूस्तीचे काम वेळखाऊ आणि जिकीरीचे असल्याने ते पूर्ण होण्यासाठी सुमारे सात ते आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या कामाला सध्या ब्रेक लागला असून नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.दुरुस्तीचे साहित्य बोलविले नागपुरातूनजलवाहिनी दुरूस्तीचे काम लवकरच पूर्ण व्हावे यासाठी सध्या वर्धा नगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. लिकेज झालेली मुख्य जलवाहिनी जुनी असल्यामुळे पुुरेशी काळजी घेऊन दुरूस्ती काम सुरू करण्यात आले आहे. दुरूस्तीच्या कामासाठी लागणारे आवश्यक पाईप व इतर सुटे भाग नागपूर येथून बोलविण्यात आले आहे.या भागातील पाणी पुरवठा राहणार बंदवर्धा न.प. प्रशासनाकडून युद्धपातळीवर जलवाहिनी दुरूस्तीचे काम होत असले तरी सुदामपुरी, मोहिनीनगर, नागपूर रोड, यशवंत कॉलनी, हिमालय विश्व, स्नेहलनगर, विद्यानगर, लक्ष्मीनगर, सेवाग्राम रोड, सिव्हील लाईन, महादेव पुरा, इतवारा, पुलफैल, आनंदनगर, गोंड प्लॉट, पोलीस वसाहत येथील पाणी पुरवठा पुढील दहा दिवस बंद राहणार आहे. शिवाय पर्यायी व्यवस्था म्हणून आय.टी.आय टेकडी येथील जलशुद्धीकरण केंद्र येथून वर्धा शहरातील नागरिकांना शक्य झाल्यास तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले जात आहे.
सर्व तांत्रिक बाबी लक्षात घेऊन जलवाहिनी दुरूस्तीचे काम केले जात आहे. लिकेज झालेल्या ठिकाणी खोदकाम केले असता ११ केव्हीची विद्युत वाहिनीही असल्याचे पुढे आले आहे. दुरूस्तीच्या कामात काही अडचणी येऊ नये म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी आणखी काही दिवस लागणार असून नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा.- अतुल तराळे, नगराध्यक्ष वर्धा.