वर्धा : शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या ठाकरे मार्केट परिसरात देशी-विदेशी दारूसाठा उतरवित असतानाच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस पथकाने छापा मारून दोन आरोपींना अटक केली. तर दोन जण पसार झाले. पोलिसांनी कारसह ५ लाख ७९ हजार २०० रुपयांचा दारूसाठा जप्त केला. ही कारवाई २१ रोजी करण्यात आली.
तन्नू गोरख पाझारे (रा. किन्हाळा, ह. मु. मास्टर कॉलनी) आणि यश चंद्रशेखर देवगडे (रा. समतानगर) असे अटक आरोपींचे नाव आहे. तर आयूष वावरे (रा. भीमनगर), कोहीनूर उके (रा. झोपडपट्टी, सावंगी मेघे) हे पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार झाले.
ठाकरे मार्केट परिसरात देशी विदेशी दारूसाठा उतरणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पथकाला मिळाली होती. पोलिसांनी तत्काळ ठाकरे मार्केट परिसरात नाकाबंदी केली. तेवढ्यातच एक (एमएच ०६ एबी ३०२५) क्रमांकाची कार आली आणि ठाकरे मार्केट परिसरात कारमधील चौघे उतरले आणि दारूसाठा खाली उतरवू लागले. दरम्यान, पोलिसांनी छापा मारून दोघांना अटक केली. तर दोघे फरार झाले. पोलिसांनी दारूसाठ्यासह मोबाइल असा एकूण ५ लाख ७९ हजार २०० रुपयांचा दारूसाठा जप्त केला. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, अमर लाखे, पवन निलेकर, समीर शेख, मंगेश चावरे, राजू वैद्य, प्रमोद वाघमारे यांनी केली.