तिघांना अटक : चोरीचे साहित्य खरेदी करणाराही ताब्यात लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : आष्टी येथील आॅईलचे दुकान फोडून त्यातील साहित्य चोरून ते छिंदवाडा येथे विक्री करणाऱ्या तडीपार आरोपींना पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांकडून चोरीतील १ लाख ६७ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी अमरावती जिल्ह्यातील वरुड येथून ताब्यात घेतले आहे. आष्टी येथील मोहसिन खान पठाण यांच्या दुकानातून चोरट्यांनी चारचाकी वाहनांना कामी येणाऱ्या बॅटरी आणि आॅईल डब्बे लंपास केले होते. या प्रकरणी पोलिसात दाखल तक्रारीवरून एकूण १ लाख ५६ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला होता. या चोरीचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे वरूड तालुक्यातील शहापूर जि. अमरावती येथून महेंद्र पिंताबर कपूर (२८), शिवराम उर्फ राम सुरज धुर्वे (२७) व सुनील उईके (१९) रा. वरुड या तिघांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना विचारणा केली असता त्यांनी चोरीची कबुली देत चोरीचा मुद्देमाल छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथील फैजल खान करीम खान(२१) रा. पुराना बैल बाजार याला विकल्याची कबुली दिली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छिंदवाडा गाठत फैजल खान करीम खान याला अटक करुन त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल ताब्यात घेतला. जप्त केलेल्या साहित्याची किंमत १ लाख ६७ हजार १५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर गुन्ह्यातील महेंद्र पिंताबर कपूर व शिवराम हे अट्टल गुन्हेगार असून त्यांना वरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आलेले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस, अपर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार उदयसिंग बारवाल, नरेंद्र डहाके, परवेज खान, अमर लाखे, दिवाकर परिमल, आनंद भस्मे, सचिन खैरकार, समीर कडवे, तुषार भुते, जगदीश डफ, मुकेश येल्ले यांनी केली.
तडीपार गुंडांकडून आष्टीत चोरी
By admin | Published: July 08, 2017 12:20 AM