लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत छोट्या-मोठ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये दुचाकी व मोबाईलची चोरी, घरफोड्या, चोऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. दुचाकी चोरीची केवळ नोंद होते. परंतु, चोरट्याने चोरलेल्या दुचाकींच्या पार्टची कोठे विक्री केली जाते, त्याचा तपास करण्याची गरज आहे. चोरीचे साहित्य विकत घेणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली तरच चोरींचे प्रकार रोखले जातील. अन्यथा चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नॅचिंग अशा घटना कधीच थांबणार नाहीत, अशा सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आहेत. शहरासह जिल्ह्यात मंदिरे, हॉटेल, ढाबे आणि घरे यांच्या बाहेर उभ्या केलेल्या दुचाकी सर्रास लंपास होत आहेत. जिल्ह्यात दिवसभरात किमान तीन ते चार दुचाकी चोरीला जात आहेत. याची पोलिसात नोंद होते. मात्र, चोरीला गेलेली दुचाकी क्वचितच सापडते. शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने पोलिसांकडून वेगवेगळी तपास पथके नेमून एखाद्या चोरट्याला अटक केली जाते. त्यांच्याकडून दुचाकीही जप्त केल्या जातात. परंतु, त्यापूर्वी चोरीला गेलेल्या दुचाकी नेमक्या कुठे गेल्या, याबाबत कोणताही धागादोरा हाती लागलेला दिसत नाही. शहरात दुचाकी चोरल्यानंतर तिचे पार्ट काढून विकणाऱ्या टोळ्या सक्रिय असाव्यात, असा संशय आहे. हे रोखण्यासाठी नशेखोर तसेच सराईत दुचाकी चोरटे आणि चोरीच्या वाहनांचे पार्ट विकत घेणाऱ्या टोळ्यांचा बिमोड करण्याची नितांत गरज आहे.
चोरीच्या वस्तू घेणाऱ्यालाही आरोपी करावे- चोरीचा माल विकत घेणारी टोळी सक्रिय असल्याने चोरट्यांची टोळीच कार्यरत आहे. पोलीस चोरट्याला पकडतात. त्याच्यावर आरोपी म्हणून खटला भरतात. परंतु, त्याने ज्याला वस्तू अथवा सोने विकले आहे, त्या खरेदीदारालाही संबंधित गुन्ह्यात आरोपी केले पाहिजे. तशी कायद्यामध्ये तरतूददेखील आहे. चोरट्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडील वस्तू विकत घेणाऱ्याला साक्षीदार न करता दोघांवरही गुन्हे दाखल करुन कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्याची गरज आहे.
चोरीचे मोबाईल घेतात कोण?- मोबाईल हरवल्याच्या वा चाेरीला गेल्याच्या तक्रारी जिल्ह्यात दररोज येत आहेत. अनेक प्रकरणं पोलीस दप्तरी तसेच ऑनलाईन पोर्टलद्वारे पोलिसांना प्राप्त होत आहेत. मात्र, चोरीचे मोबाईल विकत घेणारी यंत्रणा असली पाहिजे. अन्यथा मोबाईलची अशी सर्रास चोरी झालीच नसती. पोलिसांनी ती यंत्रणा शोधून काढली की, चोऱ्या थांबतील हे देखील तितकेच खरे.
चोर सापडतो, मात्र विकत घेणारा मोकाट फिरतो.
- शहरात चोरलेल्या वस्तूंची विक्री करणारी टोळी सक्रिय आहे. या टोळ्यांकडून जिल्ह्याबरोबरच परराज्यातही वाहनांच्या पार्टची विक्री केली जात असावी, असा संशय आहे. दुचाकी, चारचाकी आणि ट्रकच्या चोरलेल्या साहित्याची सर्रास विक्री केली जाते. सध्या टायरही चाेरीला जात आहेत. वाहन ‘मॉडीफाय’ करण्यासाठी चोरलेल्या साहित्याचा वापर करण्यात येतो का, तेही तपासले जाणे गरजेचे आहे. चोरी आणि इतर गंभीर प्रक्रारचे गुन्हे करण्यासाठी चोरलेल्या वाहनांचा वापर होतो. मोबाईल आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरणारी टोळीदेखील सक्रिय आहे. शहरासह जिल्ह्यात चेन स्नॅचिंगच्या घटनाही घडल्या आहेत. गळ्यातील दागिने धूमस्टाईलने लुटण्यात येत आहेत. परंतु, हे लुटलेले सोने नेमके जाते कुठे, याचा शोध घेतला पाहिजे. यामध्ये चोरलेले सोने परराज्यात नेऊन त्याची विल्हेवाट लावली जाते का, यात कोणत्या राज्यातील टोळीचा सहभाग आहे, चोरीचे सोने विकत घेणारे कोण आहेत, याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.