वर्धा : बनावट कागदपत्रे तयार करून तसेच तोतया व्यक्ती उभे करून मूळ मालकाची संमती न घेता शेतजमिनी विकून ३४ लाख ८१ हजारांनी फसवणूक करणाऱ्या चार आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
मोहन दयारामजी मेश्राम, रा. सानेवाडी, मोबीन सॉले मोहम्मद खान, सुरेंद्र श्यामसुंदर महाद्वारे, दोन्ही रा. नागपूर तसेच शेख युसूफ शेख गुलाब रा. देवळी अशी अटक आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्राप्त माहितीनुसार, आरोपींनी देवळी तालुक्यांतर्गत मौजा ढोणापूर येथील शेत सर्व्हे क्रमांक २६, २७, २८ व २९ ही शेती विकायची असल्याचे फिर्यादीला सांगून बैठक केली. बैठकीत आरोपी मोहन मेश्राम याने शेती विक्री करारनाम्यात शेतमालक सुराजी मकवाना यांच्याकडून २२ फेब्रुवारी २०२२ रोज इसारपत्र केल्याचे दाखविले. फिर्यादीला खात्री पटल्याने त्यांनी शेती घेण्याचे ठरविले. फिर्यादीने शेती विक्रीसाठी आरोपींना चेक व नगदी स्वरूपात रक्कम दिली. आरोपींनी मूळ शेत मालकाऐवजी तोतया इसमांना उभे करून बनावट कागदपत्राआधारे फिर्यादीचा विश्वास संपादन करून शेतीची विक्री करीत एकूण ३४ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपविण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना एक आरोपी शेगाव व दुसरा आरोपी नागपूर येथे असल्याचे समजले. त्यावरून पोलिस पथकाने शेगाव गाठून आरोपी मोहन मेश्राम, रा. सानेवाडी याला तर आरोपी (तोतया) मोबीन सॉले मोहम्मद खान, व (तोतया) सुरेंद्र श्यामसुंदर महाद्वारे, दोन्ही रा. नागपूर यांना नागपूर येथून अटक केली, तसेच तपासादरम्यान आरोपी शेख युसूफ शेख गुलाब, रा. देवळी अशा चारही आरोपींना २ रोजी अटक केली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक कांचन पांडे, पोलिस उपनिरीक्षक विवेक राऊत, शैलेश भारशंकर, गजानन काळे, संतोष जयस्वाल, निकेश गुजर, स्वप्नील भारद्वाज, कुणाल डांगे, आशिष महेशगौरी, प्रतीक नगराळे, जोत्सना रोकडे, मनोज झाडे यांनी केली.