वर्धा पंचायत समिती येथील प्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांचा याचिकेवरील निर्वाळालोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पंचायत समितीमध्ये सभापती आणि उपसभापती निवडीप्रसंगी भाजपच्या पाच सदस्यांनी विरोधी गटातील उमेदवाराला मतदान केले होते. यामुळे पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत पाचही सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिकेतून केली होती; पण पक्षाचा व्हीप बजावल्याचा पुरावा सादर न करता आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पाचही सदस्यांचे सदस्यत्त्व कायम ठेवले. या निर्णयामुळे चंदा सराम, ज्योती टिपले, दूर्गा ताजने, सुनीता मेघे, मुते यांचे सदस्यत्त्व कायम आहे.वर्धा पंचायत समितीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली होती. त्यावेळी भाजपचा सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उपसभापती पद देण्यावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये एकमत झाले होते. त्यानुसार भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी स्थापन करीत गटनेता म्हणून महेश आगे यांची निवड करण्यात आली होती. सभापती म्हणून भाजपच्या महानंदा ताकसांडे यांची निवड झाली; पण राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप किटे यांना भाजपच्या पाच सदस्यांनी त्यावेळी मतदान केले नाही. यामुळे काँग्रेस समर्थीत अपक्ष उमेदवार सुभाष चांभारे यांची उपसभापतिपदावर निवड झाली. पंचायत समितीचे गटनेता महेश आगे यांनी याबाबत संबंधित उमेदवारांनी पक्षाचा व्हीप झुगारल्याने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिकेतून केली. याचिकेची सुनावणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकला. त्यावेळी हा व्हीप मिळालाच नसल्याचा मुद्दा पाच सदस्यांनी मांडला. व्हीप न मिळाल्याने पक्षाच्या विरोधात काम केल्याचे म्हणू शकत नाही. याबाबत याचिकाकर्त्यांकडून कागदोपत्री पुरावा सादर न करता आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याचिका फेटाळत सदस्यत्त्व रद्द करण्यास नकार दिला. पाच सदस्यांकडून अॅड. वैभव वैद्य यांनी युक्तीवाद केला.
‘त्या’ पाच जणांचे सदस्यत्त्व कायम
By admin | Published: July 11, 2017 12:57 AM