वर्धा : शाळा, महाविद्यालये, सर्व आरोग्य संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही केले जात आहेत. यात शाळेतील शिक्षक, कर्मचारी स्वत: तंबाखू खात वा सिगारेट ओढत नसावा, आवारात कुणी तंबाखू खात नसावे, शाळा, महाविद्यालयांच्या १०० मिटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत नसावी यासह अन्य निकषांचा समावेश आहे. हे निकष पूर्ण करणाऱ्या शाळांना तंबाखूमुक्त जाहीर केले जात आहे. सध्या जिल्ह्यातील पाच शाळांनी हे निकष पूर्ण केले आहेत. तंबाखू नियंत्रण सप्ताह आणि जागतिक कर्करोग दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. शासनाने सार्वजनिक स्थळी धूम्रपानास मनाई केली आहे. २० पेक्षा अधिक लोक एकत्र येत असतील अशा ठिकाणी हा नियम लागू होतो. यासाठी कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. यावरही प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. सार्वजनिक स्थळी धाड टाकून कारवाई करण्यासाठी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. यात आरोग्य विभाग, अन्न व औषधी प्रशासन, शिक्षक आणि पोलीस कर्मचारी अशा चार व्यक्तींचा समावेश आहे. सार्वजनिक धूम्रपान करणाऱ्यास २०० रुपये दंड आकारला जात आहे. चार कारवाईमध्ये पथकाने ८०० रुपयांचा दंडही वसूल केला आहे. तंबाखूमुक्तीसाठी आरोग्य यंत्रणेकडून राबविला जात असलेला हा प्रकल्प कॅन्सरचे रुग्ण शोधणे आणि व्यसनाधीन व्यक्तींना तंबाखूपासून दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू लागला आहे.
‘त्या’ शाळांनी केले निकष पूर्ण
By admin | Published: February 02, 2017 12:48 AM